राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचे गेल्या आठवड्यात सूप वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वत्र आढावा बैठका, सभा, विशेष मोहिमा घेणे सुरू आहे. त्यासाठी काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पक्षासह अनेक प्रमुख पक्षांचे राष्ट्रीय स्तरावरील नेते राज्याला भेट देत मार्गदर्शन करत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी बैठक

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी काँग्रेसने शुक्रवारी बैठक बोलावली आहे. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत ही बैठक होत असून राज्यातील काँग्रेसचे आमदार, खासदार व पक्ष पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा >>> Kangana Ranaut : “पुढाऱ्यांनी राजकारण करू नये तर गोलगप्पे विकावे?” एकनाथ शिंदेंसाठी कंगना रणौत मैदानात; शंकराचार्यांना म्हणाल्या…

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली १९ जुलैला सकाळी १० वाजता गरवारे क्लब येथे बैठक होईल. त्याला राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रभारी, खासदार, आमदार, आघाडी संघटनांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक होईल.

या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले जाणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस आमदारांच्या मतांच्या फाटाफुटीबद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे. पक्षाच्या विरोधात मतदान करणाऱ्या आमदारांच्या विरोधात लवकरच कारवाई केली जाणार आहे.

समाजवादी पक्षाचे सर्व ३७ खासदार मुंबई भेटीवर

मुंबई : समाजवादी पक्षाने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तर प्रदेशातील पक्षाचे सर्व ३७ खासदार शुक्रवारी मुंबई भेटीवर येत आहेत. या भेटीत ते सिद्धीविनायक मंदिर, चैत्यभूमी, मणिभवन आणि शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.

यासदंर्भात माहिती देताना समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी म्हणाले, देशात समाजवादी पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा बनला आहे. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा ‘जश्न ए फतह’ १९ जुलै रोजी रंगाशारदा सभागृहात होणार आहे. त्यासाठी सर्व खासदारांना मुंबईत येणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला महाविकास आघाडीकडून अधिक जागांची अपेक्षा आहे. महाराष्ट्र हा समाजवाद्यांचा गड राहिलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरातील विशाळगड हिंसाचारप्रकरणाचा आझमी यांनी निषेध केला. गडावरील मशिदीवरील हल्ल्याबाबत दंगलखोरांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

पुण्यात भाजपचे अधिवेशन, राज्यात संवाद यात्रा

मुंबई : भाजपने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीला वेगाने सुरुवात केली असून पक्षाचे १९ वरिष्ठ नेते राज्यभरात संवाद यांत्रा काढणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपचे पुण्यात २१ जुलै रोजी पुण्यात अधिवेशन होणार असून त्यात संवाद यात्रेची रुपरेषा ठरविण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ही यात्रा राज्यातील २८८ विधानसभानिहाय काढण्यात येणार असून प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका क्षेत्रातही जाणार आहे. तर पुण्यातील प्रदेश कार्यकारिणीच्या रविवारच्या अधिवेशनामध्ये आगामी धोरणे आणि दिशांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह अन्य प्रमुख नेते पाच हजार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.