डोंबिवली: ठाणे जिल्ह्यातील भाजपचे मातब्बर नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना घेरण्यासाठी डोंबिवलीत सर्वपक्षीय मोहीम राबवली जात आहे का अशी चर्चा आता सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुक तोंडावर असताना खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि युवा सेनेचे (शिंदे) पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. म्हात्रे यांच्यासोबत आणखी काही नगरसेवक ठाकरे यांच्याकडे जातील असा अंदाज बांधला जात होता. खासदार शिंदे यांनी ही संभाव्य फुट टाळली असली तरी दिपेश यांचा शिवसेनेतील (ठाकरे) प्रवेश अनेकांना बुचकळ्यात पाडणारा ठरला आहे.

डोंबिवली हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी नेहमीच पोषक असा विभाग मानला जातो. संघ विचारांना मानणारा एक मोठा वर्ग या शहरात रहातो. त्यामुळे डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून १५ वर्षांपुर्वी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली गेल्याने संघ वर्तुळातही अनेकांना तेव्हा धक्का बसला होता. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार आले आणि चव्हाण राज्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीयांमध्ये पुढे ते गणले जाऊ लागले आणि आता सार्वजनिक बांधकाम विभागासारखे प्रभावी खाते त्यांच्याकडे असल्याने संपूर्ण कोकण पट्टीत चव्हाण हे भाजपसाठी ‘संकट मोचक’ समजले जाऊ लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जाणाऱ्या ठाण्यातही जुन्या जाणत्या संजय केळकरांपेक्षा चव्हाण यांचे संघटनेत भलतेच ‘वजन’ वाढल्याचे अलिकडे दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील सुरक्षीत मतदारसंघातच त्यांना आव्हान उभे राहील अशापद्धतीची नेपथ्यरचना गेल्या काही दिवसांपासून मांडली जात असल्याने चव्हाण समर्थक आणि भाजप नेतेही सावध झाले आहेत.

हेही वाचा >>>मराठवाड्यातील निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवडणुकीचे वेध

दिपेश म्हात्रे आव्हानवीर ठरतील ?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दिपेश म्हात्रे काही काळ तटस्थ भूमीकेत पहायला मिळाले. शहराचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांचे पुत्र असलेले दिपेश यांनी काही काळ कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापतीपद देखील भूषविले आहे. डोंबिवलीतील ‘धनवान’ कुटुंबांपैकी एक मानल्या जाणाऱ्यांपैकी दिपेश हे एक आहेत. शिवसेना एकसंघ असताना आदित्य ठाकरे यांच्याशी ते जवळीक साधून होते. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आल्यानंतर मात्र वारे फिरले आणि दिपेश शिंदेवासी झाले. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात . असे असताना विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांचा ठाकरे गटात झालेला प्रवेश अनेकांना चकीत करुन गेला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावरच दिपेश यांचा ठाकरे गटातील प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. चव्हाण यांच्याविरोधात शड्डू ठोकण्यासाठी त्यांनी प्रभावी पदाधिकाऱ्यांशी जुळवाजुळवही सुरु केल्याची चर्चा होती. खासदार शिंदे यांनी इतर पदाधिकाऱ्यांना रोखण्यात यश मिळविले, मात्र दिपेश यांना ते का रोखू शकले नाहीत याविषयी आता वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. चव्हाण आणि शिवसेनेतील (शिंदे) ताणलेले संबंध यापुर्वीही लपून राहीलेले नाहीत. अशा परिस्थितीत शिंदेसेनेतील एक महत्वाचा पदाधिकारी चव्हाण यांचा आव्हानवीर कसा होता अशी चर्चा आता भाजपच्या गोटातही दबक्या सुरात सुरु झाली आहे.