आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वपक्षीय नेतेमंडळींनी आपली मुले, पत्नी, भाऊ, सुना अशा नातेवाईकांना उमेदवारी मिळावी या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत वा त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे. घराणेशाहीची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासूनच सुरू होत आहे.
लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच विविध नेतेमंडळींनी उमेदवारी आपल्या घरातच कशी राहिल या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस पक्षातील घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपची नेतेमंडळी नाके मुरडत असतात. पण राज्यातील भाजप नेत्यांना घराणेशाहीचे वावडे नाहीत. पक्षाच्या नेतेमंडळींनी उमेदवारी आपल्याच घरात कशी राहिल यावर भर दिला आहे.
हेही वाचा : टीडीपीची एनडीएमध्ये घरवापसी! याचा फायदा नेमका कुणाला? टीडीपी की, भाजपा?
सुप्रिया सुळे (बारामती), हिना गावित (नंदुरबार), केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (दिंडोरी), सुजय विखे (नगर) , पूनम महाजन (उत्तर मध्य मुंबई), श्रीकांत शिंदे (कल्याण), प्रितम मुंडे (बीड), रक्षा खडसे (रावेर), नवनीत राणा (अमरावती) या विद्यमान खासदारांना घराणेशाहीची पार्श्वभूमी आहे. हे सर्व खासदार पुन्हा इच्छूक असून, लोकसभेत परतण्याकरिता त्यांनी आतापासूनच प्रचारालाही सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून पुन्हा निवडणूक लढविणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सूनेत्रा पवार यांची बारामती मतदारसंघातून उमेदवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली कन्याण शिवानी यांना चंद्रपूरमधून उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावला आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आपले पुत्र प्रतिक पाटील यांना हातकणंगले मतदारसंघात वातावरण अनुकूल आहे का, याची चाचपणी करीत आहेत.
हेही वाचा : अकोल्यात भाजपच्या उमेदवारीत धक्कातंत्र ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू आणि गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या धरती देवरे या धुळे मतदारसंघातून इच्छूक आहेत. पाटील कन्या असल्यानेच धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांना भूषविण्याची संधी मिळाली.
कोणत्या नेत्यांची मुले किंवा घरातील इच्छूक आहेत याची यादी :
भाजप खासदार व माजी राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप (अकोला)
माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल (रामटेक)
वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात (अमरावती)
पंकजा आणि प्रितम मुंडे भगिनी (बीड)
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय (नगर)
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल (हातकणंगले)
माजी खासदार उदयसिंह गायकवाड यांचे नातू रणवीर (हातकणंगले)
माजी आमदार महादेव महाडिक यांची सून शौमिता (कोल्हापूर-भाजप)
माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांचे पुत्र समरजीतसिंह (कोल्हापूर-भाजप)
माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती (सोलापूर- काँग्रेस)
विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील (माढा-भाजप)
हेही वाचा : मावळमध्ये महाविकास आघाडीचे ठरले, महायुतीत अद्यापही अनिश्चितता
शिंदे गटाचे प्रताद भगत गोगावले यांचे पुत्र विकास (रायगड)
आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांची कन्या हिना व बंधू राजेंद्र (नंदुरबार)
भाजप नेते सुहास नटावदकर यांची कन्या समिधा (नंदुरबार)
गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या धरती देवरे (धुळे)
मंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार (धुळे)
एकनाख खडे यांची स्नुषा रक्षा खडसे (रावेर -भाजप)
माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल (रावेर – भाजप)
माजी खासदार उल्हास पाटील यांची कन्या केतकी (रावेर -भाजप)
खासदार उन्मेष पाटील यांची पत्नी संपदा (जळगाव- भाजप)
माजी महापौर दशरथ पाटील यांचे बंधू दिनकर (नाशिक-भाजप)
आमदार रवि राणा यांची पत्नी नवनीत (अमरावती-भाजप)