गडचिरोली : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लवकरच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु इच्छुकांची वाढलेली संख्या दोन्ही गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असून उमेदवारी न मिळाल्यास काहींनी अपक्ष उभे राहण्याची तयारी सुरू केल्याचे कळते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षापुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

गडचिरोलीत जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अहेरी विधानसभेत आत्राम राजघराण्यात निवडणुकीपूर्वीच राजकीय संघर्षाला सुरुवात झालेली आहे. यात महायुतीत असूनही मंत्री धर्मरावबाबा आत्राम, भाजप नेते अम्ब्रीशराव आत्राम  विधानसभेच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित आहे. महायुतीकडून ही जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता असल्याने याठिकाणी अम्ब्रीशराव आत्राम यांची बंडखोरी अटळ मानली जात आहे. दुसरीकडे मंत्री आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांविरोधातच रणशिंग फुंकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून त्यांनी विधानसभेची तयारी देखील सुरू केली आहे. या जागेवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनेही दावा केला आहे. शिवाय अनेक इच्छुक देखील आहे. गडचिरोली विधानसभेत भाजपचे विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी हे सध्या अस्वस्थ आहेत.

हेही वाचा >>> Maharashtra Election 2024 : सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादीत वर्चस्वावरून चढाओढ

स्वपाक्षातून त्यांना डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. चंदा कोडवते यांचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपने उमेदवार बदलल्यास आमदार होळी बंडखोरी करू शकतात. तर होळीची उमेदवारी कायम ठेवल्यास इतर इच्छुकांमध्येही बंडखोरीची तयारी आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे डॉ. सोनल कोवे, विश्वजीत कोवासे, मनोहर पोरेटी यांची नावे आघाडीवर आहे. त्यामुळे इतर इच्छुकांमधूनही यांच्या उमेदवारीला आव्हान मिळू शकते. परिणामी या ठिकाणी देखील बंडखोरी अटळ आहे. आरमोरी विधानसभेत भाजपमधून विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. परंतु काँग्रेसमध्ये असलेली इच्छुकांची संख्या आणि त्यातील काहींची गेल्या तीन-चार महिन्यापासून सुरु असलेली विधानसभेची तयारी, यावरून येथे देखील बंडखोरी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून या ठिकाणी रामदास मसराम, डॉ. आशिष कोरेटी, डॉ. शिलू चिमूरकर माजी आमदार आनंदराव गेडाम यांची नावे चर्चेत आहे.

हेही वाचा >>> हसन मुश्रीफ – समरजीत घाटगे यांच्यातील वादाने टोक गाठले

इच्छुकांच्या मुंबई-दिल्ली फेऱ्या जागावाटप ठरल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोणत्याही क्षणी उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक इच्छुक उमेदवार मुंबई आणि दिल्लीत ठाण मांडून बसले आहे. पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन आपण कसे योग्य उमेदवार आहोत, हे त्यांना पटवून देण्यासाठी ते धडपड करीत असल्याची माहिती आहे. तर भाजपमधील काही विद्यमान आमदार उमेदवारी न मिळण्याच्या भीतीने अस्वस्थ असल्याचे चित्र आहे.