Maharashtra Assembly Election 2024 : मराठवाड्यात जातनिहाय याद्यांचा सर्वपक्षीय खटाटोप

शहरी भागातील काही प्रभागांमध्ये अनेक कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मतदान केंद्रातील कुटुंबात ‘आपले’ आणि ‘त्यांचे’ संभाव्य मतदार याचे वर्गीकरण केले जात आहे.

Caste returns to centre stage in Maharashtra Assembly Election 2024
प्रातिनिधिक छायाचित्र : लोकसत्ता टीम

छत्रपती संभाजीनगर : ‘मराठा- ओबीसी’मधील दूभंगामुळे मतदानावर होणारा परिणाम लक्षात घेऊन मतदान केंद्रनिहाय जातीच्या याद्या तयार करण्याची प्रक्रिया राजकीय कार्यकर्ते करत असल्याचे दिसून येत आहे. २०११ मधील जनगणनेच्या आधारे अनुसूचित जाती, जमाती व मुस्लीम ही आकडेवारी उपलब्ध असली तरी मराठा किती आणि ओबीसी किती याचा तपशील अगदी गल्ली आणि मतदान केंद्रनिहाय मिळविण्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.

‘लोकसभा निवडणुकीमध्ये जातनिहाय झालेला प्रचार लक्षात घेता समाजमाध्यमांवरील प्रत्येक मजकुरावर अधिक लक्ष ठेवले आहे,’ असे बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ म्हणाले.

लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यात जात पडताळणे हे सहजपणे केले जाते. अनोळखी व्यक्तीस नुसतेच पहिले नाव सांगितल्यानंतर आडनाव जाणून घेण्याची उत्सुकता कमालीची असते. मग आडनाव कोणते हे जाणून घेण्यासाठी नाना प्रश्न विचारणे सुरू होतात. अशा वातावरणात आपला मतदार कोण , याची माहिती घेतल्यानंतर मतदार याद्यांचे मतदान केंद्रनिहाय वर्गीकरण करताना जात हा निकष प्रामुख्याने पाळला जात असल्याचे कार्यकर्ते सांगतात. अगदी शहरी भागातील काही वार्डामध्ये कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मतदान केंद्रातील कुटुंबात ‘ आपले’ आणि ‘त्यांचे’ संभाव्य मतदार याचे वर्गीकरण केले जात आहेच.

हेही वाचा >>> ‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी

मराठा- ओबीसी या दोन जातींमधील नेत्यांवर व्यक्तीगत टीका करणारा जातीव्देष पसरविणाऱ्या मजकुरावर लक्ष असल्याचे पोलिसांमधील सायबर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. बीड जिल्ह्यात हे प्रकार लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आले होते. मात्र, आचारसंहिता लागल्यापासून बीड जिल्ह्यात अद्याप पर्यंत मजकूर कमी करावा लागावा लागला नाही. संभाजीनगर जिल्ह्यात राजकीय अर्थाने अक्षेपार्ह एक मजकूर समाजमाध्यमातून कमी करावा लागला असल्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी सांगितले.

मतदान वाढवण्यासाठी प्रचार

छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भाग जातनिहाय वसलेले असल्याने कोणत्या जातीचे प्राबल्य हे लगेच कळते. काही नव्या भागात जातीचा तपशील मिळवावा लागत असल्याचे कार्यकर्ते आवर्जून सांगतात. कुटुंबातील सर्व मतदान आपल्याचा पक्षाला होईल यासाठी‘अ’ दर्जा दिला असून अशा मतदारसंघात मतदान वाढवा असा प्रचार केला जात आहे. काही भागांत नव्याने आलेल्या मतदारांची जातीची माहिती कार्यकर्ते घेत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: All political parties making caste wise list in marathwada after maratha obc divide print politics news zws

First published on: 23-10-2024 at 06:27 IST
Show comments