नागपूर : घराणेशाहीचा आरोप ज्या पक्षावर केला जातो त्या काँग्रेसने आणि ज्या पक्षाचे नेते हे आरोप करतात त्या भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी विदर्भातील राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने भाजपने विधानसभा निवडणुकीत कोणताही धोका न पत्करता प्रभावशाली राजकीय घराण्यांना झुकते माप दिले आहे. हरियाणातील निवडणुकीनंतर काहीसे बॅकफूट आलेल्या काँग्रेसने देखील फारसे प्रयोग न करता मातब्बर नेत्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत अशा अनेकांना पक्षाने संधी दिली आहे.

हेही वाचा >>>Yavatmal Vidhan Sabha Constituency: यवतमाळात महाविकास आघाडीत बंडाचे निशाण; माजी आमदार संदीप बाजोरीया यांनी भरला उमदेवारी अर्ज

वरोरा मतदार संघातून माजी मंत्री दिवंगत संजय देवतळे यांचे सुपूत्र करण देवतळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सलग वीस वर्ष काँग्रेस पक्षाचे आमदार व मंत्री राहिल्यानंतर काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने माजी मंत्री नाराज होवून भाजपात गेले होते.

भाजपचे माजी नेते दिवंगत प्रभाकर दटके यांची सुपूत्र प्रवीण दटके यांना मध्य नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाकरराव दटके हे शिक्षक संघाचे नेते आणि नागपूर शिक्षक सहकारी बँक लिमिटेडचे संस्थापक म्हणूनही ओळखले जात होते.

हेही वाचा >>>Raver Vidhan Sabha Constituency: रावेरमध्ये शिरीष चौधरी, हरिभाऊ जावळे यांच्या राजकीय वारसदारांमध्ये लढत

 काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांची पत्नी अनुजा केदार यांना नागूपर जिल्ह्यातील सावनेरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजी मोघे यांचे पुत्र जितेंद्र मोघे यांना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

 वर्ध्याचा आर्वी विधानसभेचा देखील समावेश असून शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्षाचे खासदार अमर काळेंच्या पत्नी मयुरा काळे यांना संधी देण्यात आली आहे. वर्धा मधून माजी उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद शेंडे यांचे पुत्र शेखर शेंडे, अकोला दिल्ह्यातील अटोकमधून माजी आमदार सुधाकर गणगणे यांचे पुत्र महेश गणगणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजाचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे सुपूत्र ज्ञायक पाटणी यांना राष्ट्रवादी (शरद पवार) यांना उमेदवारी दिली आहे. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांना वरोरा मतदार संघातून मिळाली आहे.