अलिबाग : अलिबागच्या जागेवरून सत्ताधारी शेकापमध्ये पाटील कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाला असतानाच आता महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी या जागेवर दावा केल्याने तिढा निर्माण झाला आहे. शेतकरी कामगार पक्षासह, शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसही अलिबागच्या जागेसाठी आग्रही आहे. विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे. तसे महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये जागा वाटपावरून असलेले मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. जागा वाटपातील गुंतागूत वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघात सध्या याचीच प्रचिती येत आहे.

अलिबागचा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एक दोन अपवाद सोडले तर या मतदार संघातून सातत शेकापचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात यावा अशी मागणी शेकापने केली आहे. या मतदारसंघातून शेकाप सरचिटणीस जयंत पाटील त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत.

हेही वाचा : Haryana Assembly Election: वडील पोलीस अधिकारी, पती सराईत गुन्हेगार आणि निवडणुकीत सामना थेट माजी मुख्यमंत्र्यांशी; कोण आहेत मंजू हुड्डा?

दुसरीकडे काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीने त्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रविण ठाकूर यंनी पक्षाकडे मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. २००४ मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे मधुकर ठाकूर निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावा असा आग्रह पक्ष कार्यकर्त्यांनी लावून धरला आहे.

हेही वाचा : Jammu Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीरमध्ये बदलाचे वारे, लोकसभेपेक्षा विधानसभेला अधिक मतदान

शिवसेनेने (ठाकरे) अलिबाग मधून जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी दिली जावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेनी या मतदारसंघावरचा हक्क सोडू नये अशी इच्छा स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष अलिबागच्या जागेसाठी आग्रही असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. त्यामुळे जागावाटपात अलिबागच्या जागेचा तिढा कसा सुटणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.