शिवसेनेचे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या महालगाव दौऱ्याच्या वेळी काही तरुणांनी त्यांच्या गाडीसमोर हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला, तर सभेच्या ठिकाणी काहीजणांनी दगडही फेकल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने करण्यात आला आहे. रमाई जयंतीच्या निमित्ताने निघालेली मिरवणूक आणि त्यानंतर झालेल्या गोंधळाच्या वातावरणास वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हे जबाबदार असल्याचा आराेप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. मात्र, हे सर्व आरोप आमदार बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी फेटाळले आहेत. सुरक्षा व्यवस्थेत दुर्लक्ष झाल्याच्या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा – शेकापच्या अस्तित्वाचाच प्रश्न
हेही वाचा – मुश्रीफ यांच्यावरील कारवाई आणि बँक अधिकाऱ्यांची कोंडी
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघातील महालगाव येथे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमास वैजापूर येथे काहिसे उशिरा पोहचलेल्या आदित्य ठाकरे यांच्या गाडीसमोर काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. गाडीवर एक दोन कार्यकर्त्यांनी दगडही टाकण्याचा प्रयत्न केल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. शिवसंवाद कार्यक्रमादरम्यान यूट्यूबवर प्रसारण करणारे काही पत्रकार समोरून दूर होत नसल्याने काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिशेने दगड भिरकावला होता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. मात्र, गर्दीत काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. हिंदू आणि दलित मतांची बेरीज होत असल्याचे दिसत असल्याने वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी हे सारे घडवून आणल्याचा आरोप विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार बोरनारे म्हणाले, एवढ्या खालच्या पातळीवरचे राजकारण करत नाही. एखाद्या मतदारसंघातून एवढे सारे घेऊन त्याला काही न देणाऱ्या अंबादास दानवेसारख्या नेत्यांनी कोणतेही कारण नसताना आरोप करणे चुकीचे आहे. सुरक्षा व्यवस्थेत चुका झाल्या असतील तर त्यांची चौकशी करावी, असे ते म्हणाले.