Allu Arjun : पुष्पा द रुल या सिनेमाच्या प्रीमियरच्या वेळी अल्लू अर्जुन गेला होता. त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली आणि त्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. या घटनेला जबाबदार धरत अल्लू अर्जुनला अटकही झाली आणि लागलीच जामीनही मिळाला. दरम्यान हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर न्यायालयात काय घडलं? तसंच अशीच एक घटना सात वर्षांपूर्वी कशी घडली होती त्याचाही उल्लेख होतो आहे. कुठल्याही सेलिब्रिटीला सामान्य माणसांप्रमाणेच हक्क असतात. तो सगळं काही नियंत्रित करु शकत नाही. असं एक निरीक्षण न्यायलायने या प्रकरणात नोंदवलं होतं. ज्याचा संदर्भ अल्लू अर्जुनच्या प्रकरणात देण्यात आला.
सात वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
सात वर्षांपूर्वी शाहरुख खानचा रईस हा सिनेमा आला होता. त्यावेळी शाहरुख कान गुजरातच्या वडोदरा रेल्वे स्थानकावर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. त्यावेळी शाहरुखला पाहण्यासाठीही गर्दी उसळली. या घटनेत चेंगराचेंगरी झाली आणि एका माणसाचा मृत्यू झाला. त्यावेळी शाहरुख खानवरही गुन्हा दाखल झाला होता. अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि त्याला अटक झाल्यानंतर अल्लू अर्जुनच्या वकिलांनी या घटनेचा संदर्भ न्यायालयात दिला आहे.
२०१७ ला नेमकं काय घडलं?
शाहरुख खान आणि रईसच्या गाण्यात झळकलेली सनी लिओनी ही अभिनेत्री हे दोघंही वडोदरा रेल्वे स्थानकावर आले होते. ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमध्ये त्यांनी प्रवास करण्यास आणि चित्रपटाचं प्रमोशन करण्यास सुरुवात केली. कारण रईस हा सिनेमा गुजरात येथील पार्श्वभूमीवर आधारित होता. यावेळी शाहरुख खानच्या चाहत्यांनी त्याची एक झलक पाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती. ट्रेन येण्यापूर्वी चाहत्यांचीच स्थानकात प्रचंड गर्दी झाली. ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस जेव्हा आली तेव्हा शाहरुख खान आणि सनी लिओनी या दोघांना प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायलाही जागा नव्हती इतकी गर्दी झाली होती. रेल्वे पोलिसांनाही ही गर्दी आवरता आली नाही. या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत एका माणसाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शाहरुख खानवरही गुन्हा दाखल झाला होता. तसंच चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाले त्यामध्ये काही रेल्वे पोलिसांचाही समावेश होता.
शाहरुखवर कुठल्या कलमांन्वये गुन्हा ?
यानंतर शाहरुख खान आणि चित्रपटाच्या निर्मात्यांच्या विरोधात कलम ३३६, ३३७, ३३८ आणि कलम ३०४ A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भातली तक्रार काँग्रेसचे नेते जितेंद्र सोळंकी यांनी केली होती. यानंतर हे प्रकरण गुजरात हायकोर्टात गेलं.
अल्लू अर्जुनच्या प्रकरणात या केसचं देण्यात आलं उदाहरण
गुजरात हायकोर्टाने या प्रकरणात शाहरुख खानवर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातून शाहरुखची मुक्तता केली. दरम्यान अल्लू अर्जुनच्या प्रकरणात याच घटनेचा उल्लेख वकिलांनी केला आहे. ज्यानंतर आपल्या समाजातले जे सेलिब्रिटी आहेत त्यांचे हक्क सामान्य नागरिकांसारखेच आहेत एखादी घटना घडली तरीही सेलिब्रिटी ते नियंत्रित कसं करणार? असं कोर्टाने म्हटलं होतं. त्याचंच उदाहरण या प्रकरणात देण्यात आलं.