संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग किंवा देशाच्या विविध भागांतील चकाचक राष्ट्रीय महामार्ग बघितल्यावर नितीन गडकरी यांचे नाव स्वाभाविकच पुढे येते. नव्याने आजपासून सुरू होणाऱ्या नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गामुळे रस्ता निर्मितीच्या क्षेत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव जोडले जाणार आहे.

नवीन रस्त्याची निर्मिती म्हटल्यावर गडकरी हे नाव घेतले जाते. मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग असो, मुंबईतील ५५ उड्डाण पूल, उत्तर प्रदेशात नव्याने तयार झालेले द्रुतगती मार्ग या साऱ्यांच शिल्पकार म्हणून गडकरी यांना श्रेय जाते. मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याकरिता गडकरी यांनी उभारलेल्या पुलांमुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे गडकरी यांचा उल्लेख ‘गडकरी नव्हे तर पूलकरी’ असा करीत असत. गडकरी यांनी रस्ते उभारणीच्या क्षेत्रात वेगळी दिशा दिली.

हेही वाचा: नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग उभारण्याचे मोठे आव्हान होते. पण गडकरी यांनी ते लिलया पेलले. स्थानिकांचा विरोध, पर्यावरणाचा मुद्दा, रस्ता बांधताना आलेले अडथळे ही सारी आव्हाने पार करीत गडकरी यांनी विक्रमी वेळात मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग उभारला होता. मोदी सरकारमध्ये २०१४ पासून भूपृष्ठ वाहतूकमंत्री या नात्याने त्यांनी देशाच्या विविध भागांतील रस्ते सुधारण्यावर भर दिला. अनेक महामार्गांच्या रुंदीकरणाचे काम मार्गी लागले. उत्तर प्रदेशात मुंबई – पुणे द्रुतगती मार्गाच्या धर्तीवर १३ द्रुतगती मार्ग उभारण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. यातील काही महामार्ग वाहतुकीला खुले झाले आहेत.

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गानंतर जवळपास दोन दशकांनंतर वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याकरिता मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. नागपूर ते शिर्डी हा पहिल्या टप्प्यातील मार्ग आजपासून खुला झाला. शिर्डीपासून पुढे भिवंडीपर्यंत महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या नवीन रस्त्याचे सारे श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचे आहे. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर त्यांनी मुंबई – नागपूर या नवीन रस्त्याची कल्पना मांडून त्याचे नियोजन केले. रस्त्याची आखणी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.

हेही वाचा: विश्लेषण: समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचे मुहूर्त का हुकले? तो कधी पूर्ण होणार?

मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग किती उपयुक्त ठरतो हे आज सामान्यांना अनुभवास येते. तेव्हाही पुणे महामार्ग बांधताना किती नावे ठेवण्यात आली होती. तसेच समृद्धी महामार्गाबाबत झाले. फडण‌वीस यांनी साऱ्यांशी चर्चा करून विरोध मावळण्यावर भर दिला. भूसंपादन ही मोठी समस्या होती. पण रस्ते विकास विभागाचे अधिकारी, स्थानिक प्रशासन तसेच विविध यंत्रणांच्या सहकार्याने या रस्त्याचे काम मार्गी लागले. राज्यात सत्ताबदल झाल्यावर फडण‌वीस यांच्या हाती तसे अधिकार नव्हते. पण समृद्धी महामार्ग मार्गी लागेल यावर त्यांचे सारे लक्ष होते. महाविकास आघाडी सरकारला वारंवार ते या संदर्भात सूचनाही करीत होते.नितीन गडकरी यांना मुंबई – पुणे द्रुतगती मार्गाचे सारे श्रेय जाते. हा रस्ता सुरू झाल्यापासून दोन दशके अजूनही गडकरी यांचे नाव घेतले जाते. तसेच भविष्यात नागपूर ते मुंबई बाळासाहे ठाकरे समृद्दी महामार्गासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जोडले जाईल.

हेही वाचा: कैलास पाटील : शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष

रस्ते विकासाच्या क्षेत्रात गडकरी आणि फडणवीस या दोन नागपूरकरांची नावे कायमच कोरली जातील. नुसते रस्त्याचे नियोजन करून भागत नाही तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक असते. गडकरी यांनी मुंबई – पुणे द्रुतगती मार्गासाठी जे केले तसेच फडणवीस यांनी मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गासाठी केले.विदर्भ, मराठवाड्यात समृद्धी महामार्गाचा भाजप व फडणवीस यांना भविष्यात राजकीय लाभ होऊ शकतो. कारण आगामी निवडणुकांमध्ये विदर्भ व मराठवाड्यात भाजपच्या प्रचारात समृद्धी महामार्गावर जोर दिला जाईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Along with nitin gadkari devendra fadnavis is now the architect of road construction mumbai pune and samriddhi highway nagpur print politics news tmb 01