राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्याच्या महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार बंडखोरी करत शिंदे गट-भाजपा सरकारमध्ये सामील झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मी नव्याने पक्ष उभा करणार असल्याचे म्हणत अजित पवार यांच्या बंडाला थेट विरोध केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक घडामोडी घडत असताना राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
सोनिया दुहान यांच्यावर शरद पवार यांनी टाकली नवी जबाबदारी
शरद पवार यांनी सोनिया दुहान यांची राष्ट्रवादीच्या दिल्लीतील कार्यालयाच्या प्रभारीपदी नेमणूक केली आहे. एका प्रकारे दुहान यांची पदोन्नती झाली आहे. दुहान या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या जवळच्या आणि विश्वासू मानल्या जातात. दुहान या मूळच्या हरियाणा राज्यातील हिसार येथील रहिवासी आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थी चळवळ आणि राजकारणात सक्रिय आहेत. नवी जबाबदारी मिळाल्यानंतर दुहान यांनी शरद पवार यांचे आभार मानले आहेत. तसेच नवी जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासनही दुहान यांनी दिले आहे.
विद्यार्थीदशेत असताना राष्ट्रवादीच्या संपर्कात
३० वर्षीय दुहान विद्यार्थीदशेत असताना राजकारणात आल्या. त्या वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्या पुण्यात आल्या होत्या. पुण्यात आल्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आल्या. त्यानंतर दिल्ली विद्यापीठात त्यांची विद्यार्थी शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. पुढे त्यांची राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
२०१९ साली ४ आमदारांना परत आणण्यात यश
२०१९ साली त्या पहिल्यांदाच प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्यासोबत चार आमदारांना गुरुग्राम येथील एका हॉटेलमधून शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आणले होते. तेव्हा दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ, शहापूरचे आमदार दौलत दरोडा, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, कळवणचे आमदार नितीन पवार या चौघांनी अजित पवार यांची बाजू घेतली होती. मात्र दुहान या चार आमदारांना शरद पवार यांच्याकडे घेऊन आल्या होत्या.
एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांना परत आणण्याचा केला होता प्रयत्न
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना परत आणण्याचा दुहान यांनी प्रयत्न केला होता. त्यांनी गोवा येथे आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते, त्या हॉटेलमध्ये खोटे ओळखपत्र दाखवून शिरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना नंतर पकडण्यात आले होते. त्यांना पुढे जामिनावर सोडून दिले होते.
महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर दुहान यांनी स्वत:ला महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवलेले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात त्या हस्तक्षेप करत नाहीत. मात्र त्या सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या विश्वासू मानल्या जातात.