उत्तर प्रदेशमध्ये रामचरितमानसवरुन वाद सुरु असतानाच आता समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यांची तुलना देवाशी करणारी दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसच्या प्रती जाळल्यामुळे वाद उफाळला होता. त्यानंतर मौर्य यांच्यासह १० लोकांवर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रचारासाठी ही गाणी प्रदर्शित केली आहेत. एका व्हिडिओमध्ये मुलायम सिंह यांना देवाची उपाधी दिली गेली आहे, तर दुसऱ्या गाण्यात मुलायम यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा जयजयकार करण्यात आला आहे. ही गाणी मुंबईत संगीतबद्ध केली असून लखनऊच्या जनेश्वर मिश्रा पार्कमध्ये चित्रीत करण्यात आले आहे.
मुलायम सिंह यांच्यावर पाच मिनिटांची आरती लिहिली गेली आहे. बिरहा लोककलेचे गायक काशी नाथ यादव यांनी ही आरती लिहिली आहे. काशीनाथ यादव हे माजी आमदार आणि समाजवादी पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मुलायम यांचे गुणगाण करताना त्यांनी लिहिले, “जय हो नेताजी की जय, भागे डर और भय, जय हो नेताजी की जय”. तसेच “गीता तुम और तुम रामायण, राम कृष्ण तुम, तुम ही नारायण हो”, अशा शब्दात याच गीतात मुलायम सिंह यांची देवाशी तुलना करण्यात आली आहे.
देवापेक्षाही मुलायम सिंह मोठे आहेत, या ओळीबाबत बोलताना काशीनाथ यादव म्हणाले की, आम्ही देवाला पाहिलेले नाही. पण आम्ही नेताजींना पाहिले. त्यांनी लोकांच्या भल्यासाठी काम केले. मुलायम सिंह सरकारच्या योजना आणि कार्यक्रमामुळे उत्तर प्रदेशमधील प्रत्येक परिवार लाभार्थी ठरला आहे.
अखिलेख यादव यांची तुलना भीष्ण व कर्णाशी
या गाण्यामध्ये अखिलेख यादव यांना ‘छोटे नेताजी’ या रुपात दाखवले आहे. उत्साहाने भरलेला युवा नेता असे वर्णन गाण्यामध्ये केलेले आहे. “अखिलेशजी तो छोटे नेताजी हैं यारो, अभी तुम जी भर के देखा नही है”. पुढच्या काही कडव्यात त्यांची तुलना महाभारतातील भीष्म आणि कर्णाशी केली आहे. “नेताजी सा चेहरा इनका, देखो तस्वीर को। लोहिया सी सोच, देख गरीबी के पीर को। जले अग्निज्वाला सा, विजेता है यारो।”, अशा शब्दात अखिलेश यादव यांचा जयजयकार करण्यात आला आहे.
मुलायम सिंह यांचे मंदिर देखील बनेल
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी अजून ही गाणी ऐकलेली नाहीत किंवा पाहिलेली नाहीत. काशी यादव हे पक्षाचे माजी आमदार आहेत. त्यांची स्वतःची निर्मिती संस्था आहे. त्यांनी वैयक्तिक स्तरावर असे गाण्यांचे व्हिडिओ बनवलेले असू शकतात. काशीनाथ यादव यांनी मागच्यार्षी जेव्हा ऑक्टोबर महिन्यात मुलायम सिंह यांचे निधन झाले, तेव्हाच त्यांच्यावर आरती लिहिण्याचा निर्णय घेतला होता. फक्त आरतीच नाही तर लवकरच नेताजी मुलायम यांचे मंदिर देखील बनतील, असेही ते म्हणाले. काशीनाथ यांनी १९९४ साली बहुजन समाज पक्षाचून राजकारणाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश घेतला. २००० ते २००६ पर्यंत ते विधानपरिषदेत निवडून गेले होते.