तेलंगाणा राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. याच कारणामुळे येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथील सर्वच प्रमुख पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आगामी निवडणूक जिंकण्यासाठी खास योजना आखली आहे. भाजपाचा सामना करण्यासाठी ते मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच मंदिराच्या पुनर्बांधणीकडे विशेषत्वाने लक्ष देत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी जगतीआल जिल्ह्यातील कोंडागाटू मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी सरकारकडून खास १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> “मी टीपू सुलतानचं नाव घेणार, काय करता ते बघतोच”; भाजपा नेत्याच्या ‘त्या’ विधानानंतर असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
के चंद्रशेखर राव यांनी जगतीआल जिल्ह्यातील कोंडागाटू मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तेलंगाणा सरकारकडून १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. कोंडागाटू हे हनुमानाचे जागृत मंदिर असल्याचे म्हटले जाते. हे मंदिर ३०० वर्षे जुने असून हैदराबादपासून २०० किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तेलंगाणा राज्यात या मंदिराला विशेष महत्त्व आहे. या मंदिरात अनेक महत्त्वाच्या व्यक्ती तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटी दर्शन घेण्यासाठी येतात. याच कारणामुळे चंद्रशेखर राव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >>> ‘कमळ’ फुलवण्यासाठी अमित शहा कोल्हापूरच्या आखाड्यात; सहकार क्षेत्रातही लगबग
याआधी चंद्रशेखर राव यांनी यदागिरीगुट्टा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी तब्बल २ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. लवकरच येथे विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. तेलंगाणामध्ये केसीआर यांना भाजपाचे आव्हान असेल. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी केसीआर यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. हिंदू मतांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.