लातूर: आगामी महापालिका निवडणुकीत जुने चेहरे बदलून नवे चेहरे द्या असा सल्ला मला जेष्ठ नगरसेवकांनी दिला असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे नगरसेवक व काँग्रेस कार्यकर्त्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने अमित देशमुख विविध कार्यक्रमात स्वतःला गुंतवून घेत आहेत. १२०० वर्षांपूर्वीची केशवराजाची मूर्ती केशवराज मंदिरात आहे .मंदिराचा जिर्णोद्धार, भक्तनिवास याचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विकास कामाबद्दल अमित देशमुख बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र अचानकपणे महानगरपालिका निवडणुकीत माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, दीपक सूळ व रवी शंकर जाधव यांचे चेहरे जुने झाले आहेत आता नव्याने संधी द्या, असे सहा वेळा नगरसेवक राहिलेले अशोक गोविंदपुरकर यांनी आपल्याला सल्ला दिला असल्याचे अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले .

हेही वाचा >>>मराठवाड्यात उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये गर्दी वाढली, शहरात मुस्लिम उमेदवाराचा शोध; जालन्यात हमरीतुमरी, राडा

या विधानानंतर काँग्रेस कार्यकर्त्यात चांगलीच खळबळ माजली आहे. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे हे ४२ वर्षाचे आहेत ,दीपक सूळ व रवी शंकर जाधव हे ४८ वर्षाचे आहेत ,आमदार अमित देशमुख यांचे वय ४९ आहे. गोजमगुंडे, सूळ व जाधव यांचे चेहरे जुने झाले असतील तर अमित देशमुख यांचा चेहरा नवा कसा असा सवाल आता केला जात आहे. नगरसेवकांचा कंटाळा आला म्हणून नव्याना संधी दिली जाणार असेल तर तोच न्याय अमित देशमुख यांनाही लावावा लागेल, अशी प्रतिक्रिया एका नगरसवेकाने व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांनी असे विधान करून ठेवल्यामुळे कार्यकर्त्यांना केवळ वापरून घेतले जाते, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार याचे वेळापत्रकही जाहीर झाले नाही ,तो विषय सध्या चर्चेत नाही तरीही अमित देशमुखांनी तो कशासाठी काढला , असा प्रश्नही केला जात आहे.