प्रदीप नणंदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर : जिल्ह्यातील उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली व नंतर अजित दादासोबत गेल्याने ते थेट कॅबिनेट मंत्री झाले. बनसोडे हे नवखे असतानाही त्यांनी कोलांटउड्या मारून मिळवलेल्या मंत्रिपदामुळे लातूरच्या अमित देशमुख यांना त्यांचे मंत्रीपद चांगले झोंबले असून बनसोडेवर देशमुख यांनी जोरदार टीका केली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातल्या राजकारणात नव्याने या विषयावर चर्चा होते आहे.

उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या युतीतून संजय बनसोडे हे आमदार झाले. उदगीरमध्ये काँग्रेसने बनसोडे यांना चांगले सहकार्य केले. पक्षाने महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली तर अमित देशमुख हे कॅबिनेट मंत्री झाले. अमित देशमुख यांना विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यमंत्रीपद मिळण्यासाठी बराच काळ काँग्रेसने तिष्ठत ठेवले होते. तिसऱ्यांदा ते निवडून आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. मात्र, संजय बनसोडे हे नशीबवान असल्याने पहिल्यांदा निवडून आले व राज्यमंत्री झाले. राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघासाठी मोठा निधी खेचून आणला अमित देशमुख पालकमंत्री असले तरी संजय बनसोडे यांच्याकडे सामान्य कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी राहायची. त्यातूनच देशमुखांपेक्षा बनसोडे कार्यक्षम असल्याची चर्चा सुरू राहिली. तेव्हाच कानामागून आले अन् शिंगे तिखट झाल्याची चर्चा सुरू झाली होती.

आणखी वाचा-भंडारा-गोंदियाची जबाबदारी रोहित पवारांकडे, प्रफुल्ल पटेल यांना शह

शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभर बनसोडे विरोधी पक्षाच्या भूमिकेत होते. अजितदादांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे बनसोडे यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आणि हे जिल्ह्याच्या राजकारणात देशमुख यांना चांगलेच झोंबले. गेल्या आठवड्यात उदगीर बाजार समितीच्या कार्यक्रमात आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख या दोन्ही बंधूंनी बनसोडे यांच्यावर सडकून टीका केली. मुंबईला जाताना हातात एक झेंडा व मुंबईहून परत येताना हातात दुसरा झेंडा ही गद्दारी इथला मतदार खपवून घेणार नाही, या शब्दात इशारा दिला. बनसोडे समर्थकांमध्ये मात्र देशमुख यांच्या या इशाऱ्याचा अर्थ सामान्य दलित कुटुंबातून पुढे आलेले बनसोडे हे देशमुख यांना खपत नाही त्यामुळे बनसोडे यांचे मंत्रीपद देशमुख यांना झोंबत असल्याची चर्चा सुरू झाली .अमित देशमुख यांच्या दैनिक एकमतच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बनसोडे यांना निमंत्रण देण्यात आले व बनसोडे यांनी व्यासपीठावर देशमुख कुटुंबातील कोणीही उपस्थित नसताना त्या कार्यक्रमाला हजेरी लावली. १४ ऑगस्ट रोजी विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त ते बाभळगाव येथे उपस्थित राहिले.

आणखी वाचा-रोल, कॅमेरा, सपोर्ट; भाजपाकडून सिनेमांना मिळणारा पाठिंबा आणि सिनेमाचे राजकारण 

देशमुखांनी केलेली टीका बनसोडे यांनी मात्र गांभीर्याने घेतली नाही. उदगीरचे माजी नगराध्यक्ष व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निटूरे यांनी मात्र आपण बनसोडे हे विकासावर लक्ष केंद्रित करणारे असल्यामुळे त्यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit deshmukh vs sanjay bansode conflict in latur politics now print politics news mrj
Show comments