या वर्षाच्या अखेरीस राजस्थनमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. सध्या येथे काँग्रेसची सत्ता असून मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत आहेत. काँग्रेसची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपाकडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाच्या केंद्रातील नेत्यांनीही या राज्याच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे. सध्या केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. ते राजस्थानमधील भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेणार आहेत.
अनेक पातळ्यांवर भाजपात संघर्ष
मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी तयार केली आहे. या आठवड्याच्या अखेरीस ही यादी सार्वजनिक केली जाण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्या राजस्थान दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. राजस्थानमध्ये भाजपा पक्षाला अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागत आहे. येथे भाजपात गटबाजी आणि दुफळी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह आणि जेपी नड्डा राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत.
सध्यातरी नरेंद्र मोदी हेच भाजपाचा चेहरा
राजस्थानमध्ये भाजपाने नुकतेच जनआक्रोश यात्रेचे आयोजन केले होते. मात्र या यात्रेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याबाबतचा रिपोर्ट दिल्लीला पाठवण्यात आलेला आहे. याच कारणामुळे आढावा घेण्याच्या उद्देशाने अमित शाह आणि नड्डा राजस्थानला पोहोचल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस भाजपापेक्षा चांगल्या स्थितीत असल्याचे म्हटले जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद कमी झाला आहे. अशोक गहलोत यांनी नुकतेच नऊ दिवसांच्या यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेला चांगला प्रतिसाद लाभला. आपल्या दौऱ्यात अमित शाह याचाही आढावा घेण्याची शक्यता आहे.
भाजपा वसुंधरा राजेंकडे नेतृत्व सोपवणार का?
सध्या राजस्थानमध्ये भाजपा अनेक अडचणींतून जात असल्यामुळे भाजपाच्या नेत्या तथा राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याकडे नेतृत्व सोपवले जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वसुंधरा राजे या भाजपाच्या राजस्थानमधील प्रभावी नेत्या आहेत. भाजपामध्ये त्यांचे वेगळे वजन आहे. असे असताना सध्या राजस्थानमधील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रातील नेत्यांची मदत घेतली जात आहे. याच कारणामुळे वसुंधरा राजे यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यास केंद्रीय नेतृत्व अनुकूल नाही का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्यातरी भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपाचा चेहरा आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र राजस्थान भाजपामधील काही नेते हे वसुंधरा राजे यांच्याकडे नेतृत्व सोपवावे, अशी मागणी करत आहेत.
दोन समित्यांत वसुंधरा राजेंना स्थान नाही
दरम्यान, गेल्या महिन्यात भाजपाने पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली. यासह भाजपाने निवडणूक समितीचीही स्थापना केली. मात्र या दोन्ही समित्यांत भाजपाने वसुंधरा राजे यांना संधी दिलेली नाही. वसुंधरा राजे यांच्या व्यतिरिक्त राजस्थानमधील भाजपाचे अनेक नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांनादेखील केंद्रीय नेतृत्वाने या दोन समित्यांत स्थान दिलेले नाही. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड, माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया आदी नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.