BJP Meeting Before Unveiling New President : लोकसभेपाठोपाठ तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपानं आता बिहारच्या निवडणुकीवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. मात्र, त्याआधी पक्षातील संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होत असल्याचं दिसून येत आहे. भाजपातील संघटनात्मक निवडणुका अंतिम टप्प्यात असून लवकरच पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जवळपास संपल्याच्या मार्गावर आहे. त्यातच मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थानही देण्यात आलं आहे. त्यामुळे पक्षाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याचीच उत्सुकता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या भाजपा कार्यकर्त्यांना, तसेच पदाधिकाऱ्यांना आहे.
भाजपाच्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी जेपी नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास तीन तास चर्चा झाली. भाजपाच्या काही नेत्यांनी ही एक नियमित बैठक असल्याचे सांगितले. तर, पक्षातील अंतर्गत सूत्रांनुसार, या बैठकीत तिन्ही नेत्यांनी भाजपामध्ये होणाऱ्या फेरबदलांवर सविस्तर चर्चा केली. बुधवारी अमित शाह, राजनाथ सिंह व भाजपाचे सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांनी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संघटनात्मक बदलांना अंतिम स्वरूप दिले, असेही सूत्रांनी सांगितले.
भाजपाने १५ राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलले
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाने पक्षातील संघटनात्मक निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली. त्यानुसार आतापर्यंत १५ राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांनी निवड करण्यात आली आहे. १९ एप्रिलपर्यंत आणखी सहा किंवा सात राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस भाजपा ज्या राज्यांमधील नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा करेल, त्यामध्ये उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. पक्षातील सूत्रांनी सांगितले की, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी २० एप्रिलनंतर नामांकन प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. याच दिवशी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण विराजमान होणार? याचे उत्तर मिळणार असल्याचं भाजपातील सूत्रांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीचा वाद संयुक्त राष्ट्रसंघात कसा पोहोचला? मुघलांच्या कथित वारसाने काय मागणी केली?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाजपा नेतृत्वाची नाराजी?
तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि द्रमुक सरकारमधील विधेयकांच्या मंजुरीवरून झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. या निकालानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वात अस्वस्थतेची भावना असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. ८ एप्रिलच्या निकालात, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला व आर. महादेवन यांच्या खंडपीठानं असा निर्णय दिला की, तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी तमिळनाडू राज्य सरकारनं मंजूर केलेली १० विधेयके राष्ट्रपतींच्या विचारार्थ अडवून ठेवली होती. राज्यपालांचा नोव्हेंबर २०२३ चा निर्णय बेकायदा आाणि चुकीचा आहे.
राज्यपालांची कृती बेकायदा असल्याचे मत
विधानसभेने पुनर्विचार करून विधेयक राज्यपालांकडे पाठविल्यानंतर त्याला राज्यपालांनी मंजूरी देणे आवश्यक आहे. राज्यपालांसमोर दुसऱ्यांदा विधेयक सादर केल्यानंतर त्याला मंजुरी द्यावी लागेल. जर पहिल्या विधेयकापेक्षा दुसरे विधेयक वेगळे असेल तरच अपवाद म्हणून त्याकडे पाहता येईल, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले. राष्ट्रपतींनी या विधेयकांवर केलेली कोणतीही कारवाईही दखलपात्र नाही. तसेच राज्यपालांकडे दुसऱ्यांदा विधेयकं सादर केल्याच्या तारखेपासून ही विधेयकं मंजूर झाल्याचं मानलं जाईल. राष्ट्रपतींनी असा संदर्भ मिळाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत राज्यपालांनी विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकांवर निर्णय घ्यावा, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले.
‘बुलडोझर न्याय’वरून न्यायालयाने फटकारले
सरकारमधील काहींच्या मते हा न्यायालयाचा अतिरेक आहे. परंतु, भाजपामधील काही नेते राज्यपाल रवी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करीत आहेत. दुसरीकडे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील घराला लागलेल्या आगीनंतर राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (एनजेएसी)वर नव्यानं वादविवाद सुरू झाला. त्यानंतर वर्मा यांची अलाहाबाद येथील त्यांच्या मूळ न्यायालयात बदली करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानं अलीकडेच ‘बुलडोझर न्याय’वरून राज्य सरकारांना चांगलंच फटकारलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अलीकडील आंतरराष्ट्रीय दौर्यांबाबत चर्चा केली. पंतप्रधान मार्चमध्ये मॉरिशसला आणि याच महिन्यात थायलंड व श्रीलंकेला गेले होते. राष्ट्रपती नुकत्याच पोर्तुगाल आणि स्लोवाकिया दौर्यावरून परतल्या आहेत.
हेही वाचा : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीमागची राजकीय समीकरणं नेमकी काय?
जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ कसा राहिला?
दरम्यान, अमित शाह यांच्याकडून राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर जे. पी. नड्डा यांना अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. नड्डा यांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबरोबर प्रभावी कार्यसंबंध प्रस्थापित केले. पक्षातील अंतर्गत सूत्रानं सांगितलं की, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना नड्डा यांनी आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली. पक्षात त्यांना एक चांगला वक्ता म्हणून ओळख मिळाली. त्यांच्या प्रभावशाली भाषणांमुळे इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भाजपाची कास धरली आणि संपूर्ण देशभरात पक्षाला मोठी बळकटी मिळाली.
भाजपाचे नवीन अध्यक्ष कोण असणार?
२०१६ मध्ये भाजपानं ‘दक्षिण मिशन’साठी एक आराखडा तयार केला होता; परंतु तो प्रभावीपणे राबविला गेला नाही. जे. पी. नड्डा यांच्या उत्तराधिकाऱ्यांसमोर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भाजपाची स्थिती सुधारण्यासाठी स्थानिक संस्कृती, भाषा आणि मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं आव्हान असेल. नवीन भाजपा अध्यक्षांची नियुक्ती ही एका नवीन टप्प्याची सुरुवात असेल, ज्यामध्ये दक्षिण भारतात पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान, भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कर्नाटकचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, तेलंगणातील भाजपा नेते किशन रेड्डी आणि ओबीसी मोर्चाचे प्रमुख के. लक्ष्मण यांसारखे नेते भाजपाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.