दयानंद लिपारे
कोल्हापूर : भाजपच्या पाठिंब्याने नव्हे तर भाजपच्या चिन्हावर कोल्हापुरात दोन्ही खासदार निवडून यावे हे भाजपचे राजकीय उद्दिष्ट राहिले आहे. जिल्हातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात ‘कमळ’ फुलवण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचा रविवारी (१९ फेब्रुवारी) कोल्हापूर दौरा होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पातळीवर विरोधकात सामसूम असताना भाजपने जोरदार मोहीम उघडली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भाजपाला मिळाल्यानंतर कल बदलू लागला. राजू शेट्टी हे दुसऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप सोबत असल्याने त्यांनाही मोदी लाटेचा लाभ झाला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजप-शिवसेना युती होती. शिवसेनेचे निवडून आलेले संजय मंडलिक (कोल्हापूर) व धैर्यशील माने (हातकणंगले) हे घराण्यात खासदारकीचा वारसा असलेले दोघेही प्रथमच संसदेत पोहोचले.
हेही वाचा… काँग्रेसमधील एकी किती काळ टिकणार?
कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा कल असा बदलत असताना भाजपा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना वेगळीच सल लसत राहिली. भाजपच्या मतावर निवडून यायचे आणि नंतर वेगळी भूमिका घ्यायची, यामुळे मधल्या काळात कार्यकर्ते दुखावले गेले. त्यातूनच भाजप, मोदी लाटेचा फायदा आणि कार्यकर्त्यांचे कष्ट याचा फायदा घेऊन अन्य कोणी निवडून येण्यापेक्षा कमळ चिन्हावर खासदार निवडून आले पाहिजेत ही भावना प्रबळ होत आहे. भाजपच्या अंतर्गत गोटातही असेच धोरणात्मक डावपेच असले असली तरी त्याची उघड वाच्यता केली जात नाही. यासाठी भाजपकडून दोन पर्याय चोखळले जात आहेत. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना कमळ चिन्हावर उभे करण्याच्या हालचाली आहेत. केवळ शिंदे गटाकडून निवडून येणे हेही इतके सोपे नसल्याने कमळ तारणहार ठरू शकेल, अशा खासदार समर्थकांच्या भावना आहेत.
हेही वाचा… सोलापुरातील वादग्रस्त नेता भाजपच्या गळाला
कोल्हापुरात कमळ हवेच
भाजपाने गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात चांगलाच प्रभाव दाखवलेला आहे. सांगली, सोलापूर व माढा या मतदारसंघांमध्ये कमळ चिन्हावर भाजपचे खासदार निवडून आले आहेत. सातारा (मध्यावधी व पोटनिवडणूक) तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजपची दुखरी नस आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये सातारा आणि कोल्हापूरातील दोन्ही जागांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक विजयी झाले असले तरी कोल्हापुर व हातकणंगले मध्ये कमळ फुलवण्याचे ध्येय घेवून कोल्हापूरचे जावई असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या पत्नी सोनल शहा यांचे शिक्षण झालेल्या न्यू एज्युकेशन सोसायटी शताब्दी कार्यक्रमास उपस्थिती लावल्यानंतर शहा हे मुख्य उद्दिष्टाकडे वळणार आहेत. भाजपच्या नूतन कार्यालयातील गणेश मंदिराची पायाभरणी केल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा जिंकणे हे उद्दिष्ट ते बोलून दाखवतील. रात्री निवडक कार्यकर्त्यांसमोर लोकसभा निवडणुक रणनीतीवर चर्चा होणार आहे. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या लोकसभा निवडणूक तयारीचा फायदा निश्चितपणे होणार असल्याचे म्हटले आहे. याचा एक अर्थ लोकसभा निवडणूक भाजप कमळ चिन्हावर लढेल असाही लावला जात आहे. अमित शहा – चंद्रकांत पाटील यांची राजकीय केमिस्ट्री अधिक जुळणारी असल्याने चंद्रकांतदादांनी दौऱ्याची भक्कम आखणी केली आहे. कोल्हापूर जिल्हा दौरा करणारे शहा चौथे केंद्रीय मंत्री आहेत. भाजपचे रथी महारथी गावोगावी फिरत असताना विरोधकांच्या छावणीत शांतता नांदत आहे.
हेही वाचा… बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मतभेदाची दरी
सहकार पातळीवर हालचाली
अमित शहा हे केंद्रातील पहिले सहकार मंत्री आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा साखर कारखानदारीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र शासनाने साखर निर्यात, इथेनॉल प्रकल्प, थकीत प्राप्तिकर आकारणी रद्द या तीन निर्णयाच्या माध्यमातून साखर कारखानदारीला मोठा दिलासा दिला आहे. याची उतराई म्हणून भाजप आणि पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या साखर कारखान्याच्या वतीने नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या मोठमोठ्या जाहिराती वृत्तपत्रात प्रसिद्ध करून शहा यांच्या दौऱ्याची वातावरण निर्मिती केली आहे. सहकारातील काही महत्त्वाचे निर्णयही अपेक्षित असल्याने राजकीय तसेच सहकार क्षेत्राचेही शहा यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.