आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पश्चिम बंगालमध्ये पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा जाहीर सभा घेणार आहेत. लवकरच पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका जाहीर होणार आहेत. या सभांच्या माध्यमातून या निवडणुकीसाठीही प्रचार केला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> अहमदनगरच्या नामांतरावर MIMची भूमिका काय? असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “अरे तुम्ही…”
मिळालेल्या माहितीनुसार आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांना समोर ठेवून या वर्षात अमित शाह आणि जेपी नड्डा पश्चिम बंगालमध्ये काही भागात जाहीर सभा घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये नेतृत्व तेवढे सक्षम नसल्यामुळे गटबाजी आणि अंतर्गत भांडणं हा भाजपाला भेडसावणारा मुद्दा आहे. याच कारणामुळे येथील नेतेमंडळी अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्या माध्यमातून ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे आमचे ध्येय असेल असे येथील भाजपा नेत्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा >>> “नितीश कुमार शिखंडी, सुरक्षारक्षकाच्या भूमिकेत आले अन्…”, RJD च्या नेत्याची मुख्यमंत्र्यावर घणाघाती टीका
शाह, नड्डा किती सभा घेणार?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने येथे १८ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे आगामी काळात हा आकडा वाढवण्याचा भाजपाकडून प्रयत्न केला जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये या वर्षी अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्या प्रत्येकी १२ सभा होणार आहेत. भाजपाला २०१९ साली ज्या मतदारसंघांत पराभवाला सामोरे जावे लागले, त्याच मतदारसंघांत या २४ जाहीर सभा आयोजित करण्यात येतील.
हेही वाचा >>> राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांना शह देण्यासाठीच सांगली बँकेची चौकशी? भाजपच्या स्थानिक नेत्यांमागे ससेमिरा
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये येत्या एप्रिल महिन्यात पंचायत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अमित शाह आणि नड्डा यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीनेही या सभांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपाच्या रुपात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यापुढे आव्हान उभे राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.