केंद्रीय मंत्री अमित शाह हे गुरुवारी कर्नाटक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कर्नाटकातील लोकांना पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी (भाजपा) राज्यात संपूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते बेल्लरीच्या संदूरमधील भाजपाच्या ‘विजय संकल्प समावेश’ कार्यक्रमाला संबोधित करत होते.
विशेष म्हणजे, अमित शाह या कार्यक्रमाला दोन तास उशिरा पोहोचले. कार्यक्रस्थळी आल्यानंतर त्यांनी उशीर झाल्याबद्दल सभेसाठी जमलेल्या लोकांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली. “मला दोन तास उशीर झाल्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. मला येथे यायला उशीर झाल्याने तुमच्यातील बहुतेकजण निघून गेले असतील, असं मला वाटलं. पण तुम्ही सर्व जण माझ्यासाठी थांबला आहात. तुमचा हा संयम दाखवून देतो की, आगामी निवडणुकीत भाजपा संपूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत येईल. ”, असं शाह म्हणाले.
हेही वाचा- “ना संप होईल, ना बंगालचं विभाजन”, आंदोलनकर्त्यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा इशारा!
यावेळी अमित शाह यांनी कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेल्या अंतर्गत कलहाची खिल्ली उडवली. काँग्रेस आणि जेडी (एस) हे पक्ष भ्रष्टाचार आणि घराणेशाहीने बरबटलेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. असे पक्ष कर्नाटकच्या विकासासाठी कधीही काम करू शकत नाहीत. येथील लोकांना जर विकास हवा असेल, तर त्यांनी भाजपाला मतदान करावं, असं आवाहन अमित शाह यांनी केलं.
हेही वाचा- आगामी निवडणुकांसाठी ॲड. प्रकाश आंबेडकरांची मोर्चेबांधणी सुरू
“२०१९ मध्ये काँग्रेस आणि जेडी (एस) च्या युतीचं सरकार स्थापन झालं आणि भ्रष्टाचाराला सुरुवात झाली. काँग्रेस आणि जेडी (एस) हे घराणेशाहीकडून चालवले जाणारे पक्ष आहेत. ते लोकांच्या कल्याणासाठी कधीही काम करू शकत नाहीत. ”, असंही शाह पुढे म्हणाले.
हेही वाचा- सोनिया-राहुल यांच्या अनुपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीवर खल
“कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात अंतर्गत कलह सुरू आहे. इतरही बरेच नेते मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. पण यामुळे कर्नाटकचा विकास होणार नाही. कर्नाटकच्या विकासासाठी मोदी हेच एकमेव पर्याय आहेत, ” असंही अमित शाह यांनी नमूद केलं.