भाषेच्या मुद्यावरून एम.के. स्टॅलिन यांचा द्रमुक पक्ष विखार पसरवत असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. गृहमंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत बोलताना त्यांनी, “भ्रष्टाचार लपवण्यासाठी द्रमुकने भाषेचा मुद्दा पुढे रेटला आहे”, असे म्हटले आहे. केंद्र सरकारने त्रिभाषिक सूत्रामार्फत तमिळनाडूमध्ये हिंदी लादल्याचा आरोप एम. के. स्टॅलिन यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना अमित शहा यांनी, “द्रमुक भाषेच्या नावाखाली विष पसरवतेय”, असा आरोप केला आहे.
त्याबाबत बोलताना ते म्हणाले, “द्रमुक पक्ष त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाषेची दुकानं चालवतो. देशातली प्रत्येक भाषा ही रत्नासारखी आहे. दाक्षिणात्य भाषांच्या आम्ही विरोधात आहोत का असं त्यांना म्हणायचं आहे का? भाषेच्या नावावर ते राजकारण करीत आहेत आणि हा त्यांचा स्वत:चा अजेंडा आहे.” “द्रमुक भाषेच्या नावाखाली देशाचे विभाजन करीत आहे”, असा आरोपही यावेळी शहा यांनी केला.
अमित शहांची तमिळनाडू सरकारवर टीका
“अभियांत्रिकी आणि वैद्यकीय परीक्षांचे अभ्यासक्रम तमीळमध्ये भाषांतरित करण्याची कुवत तमिळनाडू सरकारमध्ये नाही. ते भाषेच्या नावाखाली विष पसरवत आहेत. तुम्हाला हजारो किलोमीटर दूर असलेली भाषा आवडते; पण तुम्हाला भारतीय भाषा आवडत नाहीत. भाषेच्या नावाखाली देशाचं विभाजन तुम्ही करू नये. भाषेच्या नावाखाली तुम्ही तुमची गैरकामं आणि भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करीत आहात. उलट तुम्ही विकासाबद्दल बोलायला हवं. आम्ही तुमचा पर्दाफाश नक्की करू आणि त्यासाठी आम्ही गावोगावी जाऊन तुमची गैरकृत्यं उघड करून सांगू”, असे अमित शहा यांनी राज्यसभेत म्हटले.
तमिळनाडू राज्यसभेतील खासदारांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर हिंदी भाषा लादत असल्याचा आरोप केला. राष्ट्रीय शिक्षण धोरणात नमूद केलेल्या त्रिभाषिक सूत्राच्या अंमलबजावणीवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद वाढतच आहे. त्यावरून शुक्रवारीदेखील राज्यसभेत गदारोळ झाला.
“आपत्ती निवारण निधी देणाऱ्या गृहमंत्रालयाकडून राज्याचा बळी दिला जात असल्याचा” आरोप यावेळी एमडीएमके प्रमुख वायको यांनी केला आहे. “केंद्र सरकारचे हिंदुत्व धोरण, आरएसएस धोरण, तसेच हिंदी आणि संस्कृत भाषा धोरण लादण्याला आम्ही विरोध करत असल्याने आमच्या राज्याचा बळी दिला जात आहे”, असे वायको यांनी यावेळी म्हटले.
“भारताव्यतिरिक्त जगात ११४ हून अधिक देशांमध्ये राहणाऱ्या सुमारे १२ कोटी लोकांची मातृभाषा तमीळ आहे, असे वायको यांनी सांगितले. “गृहमंत्र्यांनी पहिल्यांदा भेट दिली तेव्हा हिंदी भाषा निश्चितच सक्तीची केली जाईल, असे म्हटले आणि त्यानंतर आंदोलन सुरू झाले”, असेही ते पुढे म्हणाले.
हिंदीविरोधी आंदोलनातूनच मी पुढे आल्याचं वायको यांनी सांगितलं.
एआयएडीएमकेचे एम. थंबीदुराई यांनी भाषेच्या मुद्द्याबाबत वायको यांचे समर्थन केले आहे. “तमीळ भाषा ही देशाची अधिकृत भाषा म्हणून जाहीर करायला हवी. दीर्घकाळापासून एआयएडीएमके पक्षाची ही मागणी आहे. दिवंगत जयललिता यांनीही अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला होता, असे थंबीदुराई यांनी म्हटले.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रस्तावित केल्याप्रमाणे त्रिभाषिक सूत्राच्या नावाखाली केंद्राने तमिळनाडूमध्ये हिंदी लादल्याचा आरोप द्रमुकने केला आहे. हा आरोप पंतप्रधान मोदींनीही फेटाळला आहे. त्याशिवाय स्टॅलिन सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबत वारंवार चिंता व्यक्त केली आहे आणि अद्याप हे धोरण राज्यात लागू होऊ दिलेले नाही.
अलीकडेच तमीळनाडू सरकारने त्रिभाषिक सूत्राला ठाम विरोध म्हणून भारतीय रुपया चिन्हाच्या जागी तमीळ अक्षर ‘रू’ वापरले होते. त्यावर भाजपाने प्रतिक्रिया देत याला ‘राजकीय नाट्य आणि मूर्खपणा’ असल्याचे म्हटले होते.