संतोष प्रधान
मुख्यमंत्रीपदासाठी लिंगायत समाजाचा चेहरा असावा, अशी मागणी करणाऱ्या सत्ताधारी भाजपमधील लिंगायत समाजाच्या नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चांगलेच फाटकारले आहे. यातून अन्य समाजाच्या मतांचे काँग्रेसकडे ध्रुवीकरण होऊ शकते ही भीती लक्षात घेता, शहा यांनी भाजप नेत्यांना परिस्थितीची जाणिव करून दिली आहे.
महाराष्ट्रातील मराठा समाजाप्रमाणेच कर्नाटकात लिंगायत समाज हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या समाजाची मते निर्णायक असतात. गेली अनेक वर्षे हा समाज भाजपच्या पाठीशी उभा राहतो, हे अनुभवास येते. येडियुरप्पा यांना बदलल्यावर मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई या लिंगायात समाजातील नेत्याकडे राज्याचे नेतृत्व सोपविण्यात आले. भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप जाहीर केलेला नाही. कारण भाजपमध्ये स्स्पर्धा आहे. बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्याचा प्रयोग फसल्याची भाजपमध्ये चर्चा आहे. कारण त्यांनी प्रशासन तसेच पक्षावर नियंत्रण ठेवता आले नाही. सध्या प्रचाराच ४० टक्के दलाली आणि भ्रष्टाचार हे दोन विषय भाजपला फारच त्रासदायक ठरत आहेत. बोम्मई यांना हे विषय हाताळता आले नव्हते.
हेही वाचा >>> चंद्रशेखर राव यांना मराठवाड्याचे एवढे आकर्षण का?
दोनच दिवसांपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बंगळुरूमध्ये बैठक झाली. त्यात पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा लिंगायत समाजातील असावा, अशी मागणी झाली. कारण काँग्रेसमध्ये सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा असली तरी दोघेही लिंगायत समाजाचे नाहीत. यामुळे काँग्रेसकडे लिंगायत मते वळू नयेत यासाठी भाजप नेत्यांची लिंगायात समाजाचा मुख्यमंत्री ही खेळी होती. पण अमित शहा यांनी ही मागणी हाणून पाडली.
हेही वाचा >>> मराठा आरक्षणावरून विदर्भात ओबीसी समाजात संतप्त प्रतिक्रिया
लिंगायत समाजाला मुख्यमंत्रीपद देण्याची जाहीर केल्यास वोकलिंग, कुरबा, दलित आदी समाज विरोधात जाण्याची भीती आहे. यातून बिदगर लिंगायत समाजाच्या मतांचे काँग्रेसकडे ध्रुवीकरण होऊ शकते. ही भीती लक्षात घेता अमित शहा यांनी लिंगायत समाजाच्या पक्षातील नेत्यांना धोक्याची जाणिव करून दिली आहे. कारण फक्त लिंगायत समाजाच्या मतांवर पुन्हा सत्ता मिळणे शक्य नाही याची शहा किंवा अन्य नेत्यांना चांगलीच कल्पना आहे.