Amit Shah on Bihar Elections : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जनादेशाने विजयी होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी (तारीख ९ एप्रिल) व्यक्त केला. जागावाटपाचा फॉर्म्युला दोन्ही पक्षातील (भाजपा-जेडीयू) नेते एकत्रित चर्चा करून ठरवतील. तसेच बिहार विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच लढवली जाईल, असंही शाह यांनी स्पष्ट केलं. ते न्यूज १८ च्या एका कार्यक्रमात बोलत होते.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठं अपयश आलं. दशकभरापासून केंद्रात एकहाती सत्ता राखणाऱ्या पक्षाला २०२४ मध्ये स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकून भाजपानं जोरदार पुनरागमन केलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला सत्तेतून बाजूला सारून भाजपानं तब्बल २७ वर्षांनंतर राजधानीत सत्ता स्थापन केली.
अमित शाहांनी केला होता बिहारचा दौरा
आता या वर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर भाजपानं लक्ष्य केंद्रित केलं आहे. बिहार विधानसभेची निवडणूक भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी अत्यंत खडतर असण्याची शक्यता आहे, कारण राज्यातील वाढते स्थलांतर, बेरोजगारी आणि इतर विविध मुद्द्यांवरून नितीश कुमार सरकारला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागू शकतो. हीच बाब लक्षात घेता, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३० मार्चला बिहारचा दौरा केला होता. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांशी त्यांनी चर्चा केली होती. केंद्रीय गृहमंत्र्यांनी भाजपाच्या ८४ आमदारांना पुढील सहा महिन्यांसाठी बूथ व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी दिली आहे.
आणखी वाचा : Congress vs BJP : भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेसचं चक्रव्यूह; गुजरातमधील अधिवेशनात काय रणनिती ठरली?
‘बिहारमध्ये एनडीए बहुमताने सत्तास्थापन करेल’
सीएनएन- ‘न्यूज १८’च्या कार्यक्रमात बिहार निवडणुकीबाबत बोलताना अमित शाह म्हणाले, “आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जनादेशाने विजयी होईल. एनडीएला विक्रमी बहुमत मिळेल आणि राज्यात पुन्हा आमचीच सत्ता असेल. बिहारची निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षातील नेते एकत्रित बसून निर्णय घेतील. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटा अपप्रचार केला होता, त्यामुळे भाजपाला नुकसान सहन करावं लागलं. मात्र, हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवला,” असंही शाह म्हणाले.
नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का?
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यश मिळाल्यास नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न अमित शाहांना विचारण्यात आला. मात्र, त्यांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. दरम्यान, गेल्या ११ वर्षांत भाजपानं उत्तर भारतात चांगलं बस्तान बसविलं असलं तरी दिल्लीनं भाजपाला आतापर्यंत हुलकावणी दिली होती. यंदा दिल्ली विधानसभेतील विजयानं पक्षाच्या विजयाचं वर्तुळ पूर्ण झालं आहे. मात्र, असं असलं तरी, बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचं भाजपाचं स्वप्न पूर्ण होणार का, याची उत्सुकता अनेकांना आहे. बिहारचे मुख्यमंत्रिपद भाजपाला मिळाल्यास उत्तर भारतातील सत्तेचे वर्तुळ पूर्ण होईल. तसेच उत्तर प्रदेश व महाराष्ट्रापाठोपाठ मोठे राज्य असलेल्या बिहारचे मुख्यमंत्रिपदही भाजपाकडे येईल.
बिहारचे मुख्यमंत्रिपद भाजपाचे लक्ष्य?
गेल्या वेळी भाजपाला बिहार विधानसभा निवडणुकीत ७५ जागा मिळाल्या होत्या. मात्र, पक्षाने युतीधर्म पाळून नितीश कुमार यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. यंदा मात्र भाजपा मुख्यमंत्रिपदाचे लक्ष्य समोर ठेवूनच रिंगणात उतरेल अशी चिन्हे आहेत. उत्तर भारतात बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे भाजपाचे लक्ष्य आहे. बिहारची पक्षाची जबाबदारी राज्यातील नेते विनोद तावडे यांच्याकडे आहे. यंदा पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळवून देण्यासाठी तावडे हे आधीपासूनच प्रयत्नशील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते बिहारच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत.
‘…म्हणून आम्ही ४०० पारचा नारा दिला’
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र, प्रत्यक्षात पक्षाला स्वबळावर बहुमताचा आकडाही गाठता आला नाही. याबाबत बोलताना अमित शाह म्हणाले, “लोकसभेत आम्हाला कमी जागा मिळाल्या हे मान्य आहे, कारण हा सर्व आकड्यांचा खेळ आहे. मला सांगा, जेव्हा एखादा संघ सामना खेळण्यासाठी जातो, तेव्हा त्यांना पराभवाची अपेक्षा असते का? २०१९ च्या निवडणुकीत आम्ही ३०० जागा जिंकल्या होत्या. मोदी सरकारने केलेली चांगली कामगिरी पाहता या निवडणुकीत भाजपाला अधिक जागा मिळतील असा आम्हाला विश्वास होता, म्हणूनच आम्ही ४०० पारचा नारा दिला, त्यात काय चूक होती,” असा प्रश्नही शाह यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “मी अजूनही सांगतो की, आम्ही तामिळनाडू आणि बिहार विधानसभेची निवडणूक जिंकू आणि त्यांचा (विरोधी पक्ष) नायनाट करू.” हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल बोलताना अमित शाह म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत देशातील मतदार विरोधकांच्या खोट्या अपप्रचाराला बळी पडले होते. मात्र, विरोधकांचा हा अजेंडा फारकाळ टिकला नाही. त्यांनी सरकारवर केलेली टीका पाहता लोकांना वाटले की, आम्ही मोदींबरोबर न्याय केला नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाला जनादेश देऊन लोकसभेची चूक सुधारली.”
बिहारसाठी भाजपाची रणनीती काय?
बिहारमध्ये सध्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे आणि काँग्रेस, आरजेडी व डाव्या विचारसणीचे पक्ष विरोधी गटात आहेत. महाराष्ट्र, हरियाणा व दिल्लीमध्ये भाजपाच्या विजयामुळे निर्माण झालेल्या गतीवर स्वार होऊन, एनडीएनं बिहारमधील २४३ पैकी २२५ जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवले आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूने बिहारमध्ये ११५ जागांवर उमेदवार दिले होते, त्यापैकी केवळ ४३ जागांवरच पक्षाला विजय मिळवता आला. दुसरीकडे भाजपानं ११० जागा लढवल्या आणि ७५ उमेदवार निवडून आणले. याच मुद्द्याला हाताशी धरून भाजपाचं राष्ट्रीय नेतृत्व बिहारमध्ये सर्वाधिक जागांची मागणी करू शकतं.