मुंबई : भाजप २०२४ ची विधानसभा निवडणूक महायुतीमध्ये तर २०२९ ची निवडणूक स्वबळावर लढेल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच केल्याने शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याबरोबरच्या महायुतीचे भवितव्याचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत.
महाराष्ट्रातही ‘शत प्रतिशत’ हे जुने स्वप्न असून सध्या महायुतीच्या पायवाटेवरून चालत असताना भाजप पुन्हा जुन्या वळणावर जाऊन डावपेच आखत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय सारीपटावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना भाजप हे प्रमुख असताना कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सत्ता मिळविता येत नाही, हे लक्षात आल्याने ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली होती.
भाजपने शिवसेनेबरोबर युती तोडण्याआधी त्याची अनेक वर्षे आधी तयारीही सुरू केली होती. २००४ नंतर महाजन यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसंदर्भात पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकांमध्ये बोलताना २००९ च्या निवडणुकीत भाजप युतीमध्ये तर २०१४ मध्ये स्वबळावर लढेल, असे नमूद केले होते. त्यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे काम पहात होते आणि त्यांच्याबरोबर भाजप नेत्यांचे खटके उडत होते. महाजन यांच्या भाकितानुसार भाजपची पुढील वाटचाल झाली. भाजप आणि शिवसेना २०१४ ची लोकसभा निवडणूक युतीत लढली, मात्र विधानसभा निवडणुकीआधी युती तुटली होती.
हेही वाचा >>> मंत्रिमंडळाच्या अजेंड्यावर गाय आणि फडणवीसांच्या तोंडी लव्ह जिहाद, व्होट जिहाद हे मुद्दे आताच का?
भाजप सध्या महायुतीबरोबर सत्तेत असून आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढेल, असे शहा यांच्यासह सर्वच नेत्यांनी सांगितले आहे. तरीही २०२९ च्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची रणनीती आखण्यास भाजपने आतापासूनच सुरुवात केली आहे आणि शहा यांनी पदाधिकाऱ्यांपुढे ते जाहीरपणे सांगितले आहे. अन्य पक्षांची ताकद खिळखिळी करून आपली ताकद वाढवून स्वबळावर सत्ता मिळविणे, ही कोणत्याही राजकीय पक्षाची रणनीती असते. त्यादृष्टीने भाजपकडून या निवडणुकीपासूनच डावपेच आखले जात आहेत. भाजप आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते यांच्याबरोबर अनेक ठिकाणी भांडणे होत आहेत.
डावपेचांची चाहूल आगामी निवडणुकीपासूनच
महायुतीमध्ये जागावाटपामध्ये अनेक जागांवर वाद असल्याने काही नेते भाजप किंवा अन्य पक्षांमधून बाहेर पडण्याची शक्यता असून ते अपक्ष किंवा अन्य पक्षांमध्ये जाऊन निवडणूक लढवतील. ते जिंकल्यास सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा भाजपबरोबर येऊ शकतील का, यादृष्टीने डावपेच सुरू आहेत. आता भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजप कार्यकर्त्यांनी अनेकदा बैठकांमधून बोलून दाखविली आहे. त्यामुळे २०२९ची निवडणूक स्वबळावर लढण्यासाठीच्या डावपेचांची चाहूल आगामी निवडणुकीपासूनच लागेल, असे सूत्रांनी सांगितले.