केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे आज हैदराबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे ७४ व्या आरआर आयपीएस बॅचच्या दीक्षांत परेडमध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी सांगितले की, “केंद्र सरकारने दहशतवाद आणि नक्षलवादाचा पूर्णपणे नायनाट करण्याचा निर्धार केला. स्वातंत्र्यानंतर अखिल भारतीय सेवांची सुरुवात करत असताना देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितले की, देशाला संविधानाच्या खाली अखंडीत ठेवण्याची जबाबदारी अखिल भारतीय सेवांची आहे. सरदार पटेल यांचे हे वाक्य आपल्या जीवनाचे गुरु वाक्य बनायला हवे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी अमित शाह म्हणाले, “भारत सरकारच्या यंत्रणांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) सारख्या संघटनेविरोधात एक दिवसात देशभर यशस्वी अभियान चालविले. मागच्या आठ वर्षात जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटना, पूर्वोत्तर भारतातील कट्टरतावादी आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात बऱ्याच अंशी यशस्वी झालो. नुकतेच पीएफआय सारख्या संघटनेवर निर्बंध लावून जगासमोर एक कडक उदाहरण प्रस्थापित केले आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारतात हिंसेला समर्थन आणि नक्षलवाद या विचारांना कोणतीही जागा नाही, असे वक्तव्य गेल्या काही दिवसांत अमित शाह यांनी केले होते. संसदेच्या सल्लागार समितीच्या बैठकीत गृह मंत्रालयाने माहिती देताना सांगितले होते की, चार दशकानंतर २०२२ मध्ये पहिल्यांदा नक्षलवादांच्या सोबतच्या चकमकीत १०० पेक्षा कमी नागरिक आणि सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झालेला आहे. २०१० च्या तुलनेत २०२२ मध्ये नक्षलवादी घटना ७६ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

दहशतवादाला आम्ही खपवून घेणार नाही. दहशतवादी विरोधी कायदा बळकट करणे, यंत्रणांना मजबूत करणे आणि दृढ राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही दहशतवादी घटनांवर नियंत्रण आणू शकलो आहोत. मागच्या सात दशकांत देशाने अंतर्गत सुरक्षेमध्ये अनेक चढ-उतार पाहिले. अनेक आव्हाने पाहिली. या आव्हानांचा सामना करत असताना आतापर्यंत ३६ हजारांपेक्षा अधिक पोलिसांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. या दीक्षांत समारंभात १६६ आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) प्रशिक्षणार्थ अधिकारी आणि परदेशातील २९ प्रशिक्षणार्थ अधिकाऱ्यांसहीत १९५ अधिकाऱ्यांनी भाग घेतला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah said government is combating with left wing extremism zero tolerance policy against terrorism kvg