नवी मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांवर दावा सांगितल्याने शहरातील राजकीय वातावरण एकीकडे ढवळून निघाले असतानाच निवडणूक तयारीचा एक भाग म्हणून मंगळवारी गृहमंत्री अमित शहा शहरात येत असल्याने भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची ही बैठक नाईक कुटुंबियांसाठी किती फलदायी ठरेल याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष या नात्याने या बैठकीच्या नियोजनाची मोठी जबाबदारी संदीप नाईक यांच्या खांद्यावर असणार आहे. स्थानिक प्राधिकरणांसोबत समन्वय, बैठक व्यवस्था तसेच स्थानिक निमंत्रक म्हणून नाईक कुटुंबीय आयोजनात महत्वाची भूमीका बजावत आहेत. बेलापूरची जागा मिळाली नाही तर आक्रमक भूमीकेत असणाऱ्या नाईकांना या बैठकीच्या निमित्ताने शहरातील अस्तित्व दाखविण्याची आयती संधी चालून आल्याने मंगळवारी होणाऱ्या या बैठकीविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
कोकण तसेच ठाणे, पालघर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा मंगळवारी नवी मुंबईत येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात ही बैठक घ्यावी असा भाजप नेत्यांचा प्रयत्न होता. यासाठी ठाण्यातील टीपटाॅप प्लाझा तसेच आणखी एका जागेची चाचपणी भाजप नियोजन मंडळाकडून करण्यात आली होती. मात्र ठाणे-कोकण पट्ट्यातून दाखल होणारे निमंत्रक कार्यकर्ते तसेच बैठकीचा एकंदर आवाका लक्षात घेता ठाण्यात या नियोजनासाठी आवश्यक जागा नाही असा अहवाल केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आल्याचे समजते. यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्जीबिशन सेंटर येथील विस्तीर्ण जागेचा प्रस्ताव पुढे आणला आणि याच ठिकाणी ही बैठक घेण्याचे ठरले. या संपूर्ण पट्ट्यात उत्तम वाहनतळ व्यवस्था तसेच मोठी बैठक व्यवस्था होऊ शकते. तसेच गृहमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपायांची आखणी करण्याची मोकळीक देखील विस्तीर्ण आणि मोकळ्या जागेमुळे सुरक्षा यंत्रणांना असू शकते. त्यामुळे वाशी रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेली हीच जागा यासाठी मंजूर करण्यात आली.
हेही वाचा – पालघर जिल्ह्यात पक्षांतर केलेल्यांचा जीव टांगणीला
हेही वाचा – सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!
चव्हाण-नाईक यांच्या खांद्यावर आयोजनाची जबाबदारी
अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त वाशी येथील आयोजनाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे असली तरी स्थानिक निमंत्रक म्हणून जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे या नियोजनाचे केंद्रबिंदू असणार आहेत. ठाणे-पालघर आणि कोकण पट्ट्यातील भाजपसाठी गुंतागुतीच्या निवडक जागांमध्ये नवी मुंबईतील बेलापूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. याठिकाण भाजपच्या मंदा म्हात्रे या सलग दोन वेळा आमदार असल्या तरी यंदा या जागेवर संदीप नाईक यांनीही दावा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बेलापूरचे दौरेही संदीप यांनी सुरु केले आहेत. काहीही झाले तरी यंदा निवडणूक लढवायची असा चंग संदीप यांनी बांधला असून यासाठी वेळ आली तर संघर्ष करण्याची भूमिकाही संदीप समर्थक जाहीरपणे बोलून दाखवित आहेत. या पार्श्वभूमीवर शहा यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी नाईक यांच्या खांद्यावर आल्याने ही बाब त्यांच्या पथ्यावर पडणारी ठरेल का याविषयी वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत. भाजपने नवी मुंबईतील दोन जागा दिल्या नाहीत तर नाईक कुटुंबीय टोकाची भूमिकाही घेऊ शकतात अशी चर्चा शहरात आहे. असे असताना शहा यांच्या दौऱ्याचे नियोजन नाईकांवर सोपवून भाजप नेत्यांनीही दुहेरी खेळी केल्याचे बोलले जात आहे.