दयानंद लिपारे

कोल्हापूर : जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार समारंभासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिल्यानंतर कोल्हापुरात राजकीय फेरबांधणीचे संकेत मिळाले आहेत. हा दौरा कोल्हापूरपुरता मर्यादित न राहता पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची पकड अधिक मजबूत करणारा व्हावा यासाठी प्रयत्न होणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

चांदी नगरी हुपरी (तालुका हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार ‘कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना’ असा करण्यात आला आहे. हा नामविस्तार समारंभ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे संचालक आमदार आवाडे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.

हेही वाचा : “दुसरे भाषायुद्ध लादू नका”, हिंदी भाषेला अधिकृत दर्जा देण्याबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आक्रमक

विधानसभा निवडणुकीनंतर आवाडे यांनी भाजपशी संबंध वाढवले आहेत. जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आवाडे यांनी विधानसभेची निवडणूक त्यांच्या ताराराणी आघाडीच्या माध्यमातून अपक्ष लढवली होती. त्यात विजयी झाल्यानंतर त्यांनी राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपला पाठिंबा दर्शवला होता.त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यांच्याकडून बोलावणे केले जात असले तरी आवाडे यांनी भाजपबरोबर मैत्र कायम राखले. दुसरीकडे आघाडी सरकारकडून विकासकामांना हेतुत: विरोध केला जात असल्याची तक्रारही त्यांनी जाहीर कार्यक्रमांमधून बोलून दाखवली होती.

हेही वाचा… विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आवाडे यांचे नाव जोडले जात आहे. गेल्या आठवड्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजीतील भाजप कार्यालयाला दिलेल्या भेटीप्रसंगी इचलकरंजी महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी भाजपला वस्त्रनगरीच्या विकासाबद्दल मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. तो येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मान्य करावा लागेल, असे सांगत भाजपा आणि आवाडे यांच्यात युती होणार असल्याचे सूतोवाच केले होते. याबाबत माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचीही भूमिका महत्त्वाची असल्याने याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा : हिमाचल विधानसभेसाठी भाजपाने कसली कंबर, चारवेळा निवडून आलेल्या ‘या’ नेत्यावर मोठी जबाबदारी

दरम्यान, आवाडे यांनी जवाहर कारखान्याच्या नामविस्तारासाठी केंद्रीय मंत्री शहा यांना निमंत्रित करणार असल्याचे सांगितले आहे. या कार्यक्रमाबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुखांची चर्चा झाली आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यात जिल्ह्याची भाजपची बांधणी अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न राहणार आहे. याचवेळी आमदार आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करतील असाही तर्क व्यक्त केला जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील आणखी काही प्रमुखांनाही भाजपच्या छावणीत आणण्याच्या हालचाली आहेत.

हेही वाचा… विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

इतकेच नाही, तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपची पकड अधिक मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात भाजपचा प्रभाव अधिक वाढीस लागला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शिंदे – भाजप गटाची स्थिती दिवसेंदिवस भक्कम होत आहे. अनेक नेते या दोन पक्षात सामील होत आहेत. कधीकाळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे बालेकिल्ले असलेले हे जिल्हे, परंतु गेल्या काही वर्षांत भाजपने नियोजनबद्धरीत्या त्यांचे हे गड खिळखिळे केले आहेत. कधीकाळी राष्ट्रवादीची इथे असलेली जागा आज भाजपने घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाचे हेच स्थान अधिक भक्कम करण्यासाठी शहा यांच्या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. या दृष्टीने शहा यांचा दौरा जंगी करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे.

Story img Loader