आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचा दौरा करीत बैठकांचा सपाटा लावला आहे. महायुतीचे जागावाटप, भाजपाची कामगिरी, तीन पक्षांतील समन्वय, नेतृत्वावरील नाराजी व मुख्यमंत्रिपदाचा दावेदार अशा अनेक प्रश्नांवर या बैठकांत चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी (२४ सप्टेंबर) नागपूरपासून बैठकांना सुरुवात झाली. त्यानंतर बुधवारी छत्रपती संभाजीनगर, नाशिक व कोल्हापूर येथे बैठका पार पडल्या. या बैठकीत अमित शाह यांनी भाजपा नेत्यांची मराठा आंदोलनाबाबत असलेली चिंता दूर केली. त्यासाठी त्यांनी गुजरातमध्ये झालेल्या पाटीदार समाजाच्या आंदोलनाचे उदाहरण दिले आणि या विषयात केंद्र लक्ष घालेल, असे सांगून पदाधिकाऱ्यांना दिलासा दिला. या बैठकांमागील राजकारणाचा दी इंडियन एक्स्प्रेसच्या लेखात उहापोह करण्यात आला आहे.
नितीन गडकरींची अनुपस्थिती चर्चेचा विषय
नागपूर येथील बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रचारात व्यग्र असल्याचे कारण यानिमित्ताने देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीत नितीन गडकरी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपाला सध्या राज्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी सर्वपक्षीय संबंध असलेले गडकरी पक्षाला मदत करू शकतात, असे एका गटाचे मानणे आहे.
मात्र, गडकरी यांनी स्वतःच २०१४ पासून राज्याच्या राजकारणातून काढता पाय घेतलेला आहे. केंद्रात गेल्यानंतर त्यांनी स्वतःला जाणीवपूर्वक राज्याच्या घडामोडींपासून बाजूला ठेवले. त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम आणि वाद असेपर्यंत आपण सक्रिय होणार नाही, असे गडकरींनी ठरविल्याचे दिसते.
सामूहिक नेतृत्वाबाबत आग्रह
विधानसभा निवडणुकीचा चेहरा कोण असणार? याबाबतही अमित शाह यांच्या बैठकीतून काही प्रमाणात स्पष्टता मिळाली. या बैठकांमध्ये ‘सामूहिक नेतृत्व’ अशी एक पुस्तिका पदाधिकाऱ्यांना वितरित करण्यात आली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर देखरेख करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समन्वयक म्हणून सह कार्यवाह अतुल लिमये यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांनीही काही दिवसांपूर्वी ‘सामूहिक नेतृत्व’ याच मुद्द्याला अधोरेखित केले होते.
मित्रपक्षांची भावना लक्षात घेऊन भाजपानेही मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत कोणतीही भूमिका आताच घेतलेली नाही. सामूहिक नेतृत्वाची ढाल पुढे केल्यामुळे उद्या जरी विधानसभेत निकाल विरोधात गेला तरी त्यातून देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर खापर फुटणार नाही, याची काळजी घेतल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा >> महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा
विदर्भावर पुन्हा पकड मजबूत करण्याचे प्रयत्न
अमित शाह यांनी नागपूर येथे बैठक घेऊन विदर्भातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. विदर्भात विधानसभेच्या ६२ जागा मोडतात. भाजपाचे विदर्भावर काही काळापासून वर्चस्व राहिले. २०१४ च्या निवडणुकीत ६२ पैकी ४४ जागांवर त्यांनी विजय मिळविला होता; परंतु २०१९ मध्ये त्यांना केवळ २९ जागांवर विजय मिळविता आला. विदर्भात जागा कमी झाल्यामुळे भाजपा बहुमतापासून बराच दूर राहिला. त्यामुळे पाच वर्षांत राज्यात बरीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने दलित, मुस्लीम व कुणबी मतांना आकर्षित करीत भाजपाला विदर्भात चांगलाच धक्का दिला. या ठिकाणच्या १० लोकसभा मतदारसंघांपैकी सात ठिकाणी मविआचा विजय झाला. मंगळवारी झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी भाजपा नेत्यांना ६२ पैकी ४५ जागा निवडून आणण्याचे लक्ष्य दिले आहे. जर विदर्भात आपण जिंकलो, तर महाराष्ट्राची सत्ताही खेचून आणू, असेही अमित शाह बैठकीत म्हणाले.
आता स्थानिक मुद्द्यांवर अधिक लक्ष देणार
अमित शाह यांनी बुधवारी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राची विभागीय बैठक घेतली. पाचव्या कोकण विभागाची बैठक पुढील महिन्यात घेणार असल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भाजपाने विभागीय समस्यांऐवजी पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारावरच भर दिला होता. हीच बाब मविआने हेरून स्थानिक प्रश्नांभोवती निवडणूक लढवली; ज्याचा त्यांना लाभ मिळाला. आता विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीमध्ये बदल करून, स्थानिक मुद्द्यांकडे अधिक लक्ष द्या, असे नेतृत्वाकडून संघटनेला सांगण्यात आले आहे.
हीच बाब संघानेही आपल्या स्वयंसेवकांना सांगितली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून सरकारच्या योजनांची माहिती देणे आणि प्रचार करण्याला प्राधान्य देण्यास सांगितले गेले आहे. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीज बिलमाफी अशा योजनांवर प्रचारात भर दिला जाणार आहे.
हे ही वाचा >> महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?
२०१९ ची आकडेवारी काय सांगते?
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाने विदर्भात ६२ पैकी २९, मराठवाड्यातील ४६ पैकी १६, उत्तर महाराष्ट्रातील ३५ पैकी १३, पश्चिम महाराष्ट्रातील ७० पैकी २० जागा जिंकल्या होत्या. कोकण (ठाणे मिळून) विभागात ३९ पैकी ११ आणि मुंबईत ३६ पैकी १६ जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत या सर्व विभागांमध्ये भाजपाची पीछेहाट झाली. २०१९ च्या तुलनेत (२३ जागा) यावेळी भाजपाने केवळ नऊ जागांवर विजय मिळविला. त्यापैकी विदर्भातील दोन, उत्तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन व कोकणातील एका जागेचा समावेश आहे. तर, मुंबईत पक्षाला सहापैकी एकच जागा जिंकता आली.
मराठा आंदोलनावरही अमित शाह यांचे वक्तव्य
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर वक्तव्य केले. ते म्हणाले, “गुजरातमध्येही अशाच प्रकारच्या आंदोलनाला आम्ही तोंड दिले. त्यामुळे हा विषय आमच्यावर (केंद्रावर) सोडा. मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मते कशी मिळतील, याकडे लक्ष द्या.”
अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर वैयक्तिक बैठक घेतली. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागावाटपात योग्य वाटा दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मागच्या बैठकीत अमित शाह यांनी भाजपाला १५५ ते १६० जागा, शिवसेना शिंदे गटाला ८० ते ८५ व राष्ट्रवादीला ५५ ते ६० जागा दिल्या जाऊ शकतात, असा फॉर्म्युला सांगितला असल्याचे दी इंडियन एक्स्प्रेसच्या लेखात म्हटले आहे.
दरम्यान, अमित शाह यांनी विदर्भासाठी निश्चित केलेले लक्ष्य साध्य करणे अवघड असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. काँग्रेस आता पूर्वीपेक्षाही अधिक बळकट झाली असून, विदर्भात सर्वांत मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे येईल, असेही ते म्हणाले.