शिवसेनेतील राजकीय बंडाळीला मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात साथ मिळाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठवाड्यातील १२ आमदारांपैकी आठ आमदार एकनाथ शिंदे यांच्या समवेत सुरत येथे असल्याने संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. यामध्ये कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात शिवसेनेची अधिक ताकद होती. तेथेच बंड झाल्याने मराठवाड्यातील शिवसेनेच्या एकजुटीवर आता प्रश्नचिन्ह लागले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातून पैठण येथील संदीपान भुमरे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ, औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल, वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे हे पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या समवेत गेले. औरंगाबाद जिल्ह्यातील हे आमदार शिंदे यांच्याबरोबर जाण्यापूर्वी मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरी जेवणासाठी आले होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हेही या वेळी त्यांच्यासमवेत होते. या घटनेबाबत बोलताना शिवसेना नेते खैरे म्हणाले,‘ रात्री संदीपान भुमरे यांच्या घरी आम्ही सारे होतो. तेथे आम्ही साऱ्यांनी जेवण घेतले. तेथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आले. ते पलिकडेच्या खोलीत गेले. त्यांचे आपसात काय बोलणे झाले माहीत नाही. जेवायचे मी थांबलो आहे, आता चला असे म्हटल्यावर सारे आले. तेव्हा सुरू असणाऱ्या कुजबुजीवरून काही तरी घडते आहे, याची शंका आली होती. पण हे असे सारे असेल असे वाटले नाही.’ औरंगाबाद जिल्ह्यातील सहा पैकी केवळ कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे एकमेव जिल्ह्यातील आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या वर्षा बंगल्यावरील बैठकीस हजर होते.
सरकारस्थापनेपासून शिवसेनेवर नाराज असणारे भूम-परंड्याचे तानाजी सावंत यांचे भाजप नेत्यांबरोबर सूत जुळले होतेच. त्यांच्याबरोबर उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौघुले हेही शिंदे यांच्याबरोबर गेले आहेत. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, राहुल पाटील हे मात्र उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीस हजर होते.नांदेडचे बालाजी कल्याणकर हेही सुरत येथे असून त्यांचा दूरध्वनीही दिवसभर बंद होता. बीड, लातूर व जालना या तिन्ही जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. मराठवाड्यातील केवळ चार आमदार शिवसेना पक्षप्रमुखांच्या बैठकीस उपस्थित होते. बाकी सारे जण संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने मराठवाड्यातील शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
हे आहेत संपर्क क्षेत्राबाहेरील मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार
संदीपान भुमरे : पैठण, अब्दुल सत्तार: सिल्लोड, संजय शिरसाठ: औरंगाबाद पश्चिम, प्रदीप जैस्वाल : औरंगाबाद मध्य, रमेश बोरनारे : वैजापूर, तानाजी सावंत : भूम- परंडा, ज्ञानराज चौघुले : उमरगा, बालाजी कल्याणकर : नांदेड उत्तर