अमरावती : जिल्‍ह्यातील राजकारणावर दीर्घकाळ वर्चस्‍व ठेवून असलेल्‍या तीन दिग्‍गजांची अमरावती विधानसभा मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी ठरली आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या (अजित पवार) उमेदवार सुलभा खोडके, काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख आणि भाजपचे बंडखोर जगदीश गुप्‍ता यांच्‍यासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्‍वाची परीक्षा घेणारी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुलभा खोडके यांनी सर्वजातीय मतांची मोट बांधण्‍याचे प्रयत्‍न केले असताना डॉ. सुनील देशमुखांची मदार ही मुस्‍लीम मतांवर आहे. जगदीश गुप्‍तांनी हिंदुत्‍वाचा झेंडा हाती घेऊन वातावरण तापवले आहे. जातीयदृष्‍ट्या संमीश्र असलेल्‍या या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्‍व अनेकवेळा सिद्ध झाले आहे. गेल्‍यावेळी सुलभा खोडके या काँग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडून आल्‍या होत्‍या. त्‍यांची जवळीक राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असल्‍याने त्‍या काँग्रेसच्‍या स्‍थानिक राजकारणापासून दूर होत गेल्‍या. पण, त्‍यांचे पती राष्‍ट्रवादीचे प्रदेश उपाध्‍यक्ष संजय खोडके यांच्‍या कार्यकर्त्‍यांचे जाळे हे सुलभा खोडके यांच्‍यासाठी बलस्‍थान आहे. सर्वच समाजघटकांचे सहकार्य मिळवण्‍याचा खोडके यांचा प्रयत्‍न प्रचारादरम्‍यान दिसून आला. गेल्‍या पाच वर्षात मतदारसंघात केलेल्‍या विकासकामांच्‍या आधारे त्‍यांनी मतदारांना आवाहन केले.

हेही वाचा >>> Chandrapur Assembly Election 2024: चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला

डॉ. सुनील देशमुख यांनी देखील त्‍यांच्‍या कार्यकाळात केलेल्‍या विकासकामांना प्रदर्शित करून मते मिळवण्‍याचा प्रयत्‍न केला. काँग्रेसची परंपरागत मते हा जनाधार टिकवून ठेवण्‍यासाठी त्‍यांच्‍या कार्यकर्त्‍यांनी परिश्रम घेतले आहेत.

अमरावती विधानसभा मतदारसंघातील एकगठ्ठा मुस्‍लीम मतांवर अनेकांचा डोळा आहे. प्रहारच्‍या उमेदवारीवर निवडणूक लढविणारे डॉ. सैय्यद अबरार यांनी अखेरच्‍या माघार घेत काँग्रेसला पाठिंबा दिल्‍याने डॉ. सुनील देशमुख यांचे बळ वाढले आहे. पण, त्‍याचवेळी निवडणूक रिंगणात इतर सहा मुस्‍लीम उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय मनसेचे पप्‍पू पाटील यांच्‍यामुळे होणारी मतविभागणी कुणाच्‍या पथ्‍यावर पडणार, याचे औत्‍सुक्‍य आहे.

हेही वाचा >>> Constituencies in Wardha District : वर्धा जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतच थेट सामना

दुसरीकडे, भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्‍ता यांनी आपल्‍या पालकमंत्रीपदाच्‍या काळात शहरात झालेली विकासकामे आणि नंतर झालेली दुरवस्‍था मांडत मते मागण्‍यास सुरूवात केली, पण त्‍यांचा भर हिंदुत्‍ववादी मतांच्‍या एकत्रिकरणावर आहे. हिंदी भाषिकांची मते ही त्‍यांची मतपेढी किती वाढते, यावर काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवा) पक्षाचे गणित ठरणार आहे. बडनेराचे आमदार रवी राणा हे महायुतीचे घटक असले, तरी त्‍यांनी जगदीश गुप्‍ता यांना समर्थन दिल्‍याने महायुतीत ठिणगी पडली. आमदार प्रवीण पोटे यांचा गट खोडकेंसोबत आहे. प्रवीण पोटे यांच्‍या गटाला राणा दाम्‍पत्‍याचा भाजपमधील वाढता हस्‍तक्षेप हा खटकणारा ठरला आहे. त्‍याविषयी पोटे यांनी उघड नाराजी देखील व्‍यक्‍त केली आहे. तरीही राणा हे उघडपणे खोडके यांच्‍या विरोधात समोर आले. प्रवीण पोटे यांचे बळ खोडकेंना कितपत लाभते, याची उत्‍सुकता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati assembly constituency three way fight in amravati maharashtra vidhan sabha election 2024 print politics news zws