अमरावती : लोकसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेत महायुतीने केलेली व्‍यूहरचना यावेळी यशस्‍वी ठरली आणि जिल्‍ह्यातील आठपैकी सात जागा महायुतीने खेचून आणल्‍या. मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज यांसह अनेक विकास योजना आणि घोषणांमुळे जनतेने महायुतीला भरभरून मतदान केले. ‘एक है तो सेफ है ’ आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ यासारख्या भावनिक आवाहनांमुळे धार्मिक ध्रुवीकरणाचे उद्दिष्ट साध्य होऊन त्याचाही लाभ झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत जिल्‍ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांमध्‍ये महाविकास आघाडीला मताधिक्‍य मिळाले होते. त्‍यापैकी केवळ दर्यापूरने महाविकास आघाडीची लाज राखली. इतर सर्व ठिकाणी महायुतीने मोठी झेप घेतली. गेल्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला होता, यावेळी काँग्रेसला एकही जागा मिळू शकली नाही. संविधानाच्या मुद्द्यावर मुस्लीम, दलित मतदारांच्या ध्रुवीकरणाने काँग्रेसला तारले. पण, यावेळी हा मुद्दा निष्‍प्रभावी ठरला. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याकांची एकगठ्ठा मते महाविकास आघाडीला मिळाली होती. यातूनच प्रचारात भाजपने ‘मुस्लीम लांगूलचालना’च्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले. लोकसभेप्रमाणे मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळतील या आशेवर काँग्रेस नेते होते. परंतु असे एकगठ्ठा मतदान काँग्रेस वा महाविकास आघाडीला होऊ शकले नाही.

हेही वाचा – यवतमाळ भाजपने दोन जागा हाताने गमावल्या! काँग्रेस, शिवसेना उबाठाने खाते उघडले

s

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये आलेला फाजील आत्मविश्वास, महाविकास आघाडीतील समन्‍वयाचा अभाव, महायुतीच्‍या प्रचारतंत्राला प्रत्‍युत्‍तर देण्‍यात आलेले अपयश यामुळे महाविकास आघाडीला जिल्‍ह्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही.

अमरावतीत मुस्‍लीम मतांमधील विभाजनामुळे काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांना हादरा बसला. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्‍या ४१ हजारांचे मताधिक्‍याचे श्रेय घेण्‍याच्‍या काँग्रेस नेत्‍यांच्‍या चढाओढीत मुस्‍लीम मतदारांनी काँग्रेसलाच दूर सारले. आझाद समाज पक्षाचे अलीम पटेल यांना मिळालेली ५४ हजार ६७४ मते ही लक्षवेधी ठरली. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते संजय खोडके यांनी भाजपशी समन्‍वय साधून आखलेली व्‍यूहनीती यशस्‍वी ठरली. बडनेरात युवा स्‍वामिभान पक्षाचे रवी राणा यांची जादू पुन्‍हा चालली.

हेही वाचा – यंदा विरोधी पक्षनेतेपद रिक्त? संख्याबळ नसतानाही पूर्वी जनता पक्ष, शेकापला संधी

तिवसा, अचलपूर, मोर्शी, धामणगाव रेल्‍वे या मतदारसंघांमध्‍ये हिंदुत्‍वाचा मुद्दा प्रभावी ठरला. भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा यांनी हा विषय गाजवला. त्‍याला उत्‍तर देण्‍यात महाविकास आघाडी कमजोर पडली. त्‍यामुळे गेल्‍या दोन दशकांपासून मतदारसंघावर पकड ठेवून असलेल्‍या काँग्रेसच्‍या यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्‍का बसला. राज्‍यात तिसरी आघाडी स्‍थापन करणारे बच्‍चू कडू अचलपूर हा गड राखू शकले नाहीत. यावेळी जातीय समीकरणे ही त्‍यांच्‍यासाठी प्रतिकूल ठरली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अभिजीत अडसूळ आणि राणा दाम्‍पत्‍याच्‍या भांडणाचा लाभ दर्यापुरात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाला झाला. तर मेळघाटात प्रहारचे राजकुमार पटेल यांच्‍याविषयीची नाराजी भाजपचे केवलराम काळे यांच्‍या पथ्‍यावर पडली. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे हुरळून गेलेल्‍या काँग्रेसला या निकालाने जमिनीवर आणले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati district assembly election results religious polarization bjp ladki bahin yojna print politics news ssb