अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या ३८ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये जिल्‍ह्यात सर्वाधिक उत्सुकता होती ती अमरावती विधानसभा मतदारसंघाची. आता सुलभा खोडके या अमरावतीतून राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या उमेदवार असतील, अशी घोषणा तटकरे यांनी केली. दुसरीकडे, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या उपस्थितीत काँग्रेसचे नेते आणि माजी उपमहापौर शेख जफर तसेच अधिवक्‍ता शोएब खान यांनी मुंबई येथे राष्‍ट्रवादीत प्रवेश केला. हा काँग्रेससाठी मोठा धक्‍का मानला जात आहे.

सुलभा खोडके या गेल्‍या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडून आल्‍या होत्‍या. पण, काही दिवसांपुर्वीच त्‍यांना पक्षातून निलंबित करण्‍यात आले होते. त्‍याचे पती संजय खोडके हे राष्‍ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्‍यक्ष आहेत. सुलभा खोडके यांना महायुतीत राष्‍ट्रवादीची उमेदवारी मिळेल, असे संकेत होते. ती प्रतीक्षा आज संपली.

हेही वाचा : घराणेशाही आणि बाहेरून आलेल्यांचे लाड होत असल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये असंतोष

दुसरीकडे, माजी उपमहापौर शेख जफर शेख जब्‍बार आणि अॅड. शोएब खान यांनी राष्‍ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्‍याने सुलभा खोडके यांना मोठे बळ मिळाले आहे. अॅड शोएब खान यांनी अमरावती मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण, काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्‍याआधीच त्‍यांनी राष्‍ट्रवादीत प्रवेश केला. शेख जफर आणि अॅड शोएब खान हे अल्‍पसंख्‍यांक समुदायात प्रभावी मानले जातात. त्‍यांची कितपत मदत खोडके यांना होईल, हे येत्‍या काळात दिसून येणार आहे.

जगदीश गुप्‍ता बंडखोरी करणार का?

भाजपचे नेते आणि माजी पालकमंत्री जगदीश गुप्‍ता यांनी निवडणूक लढण्‍याची तयारी केली आहे. भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी आशा त्‍यांना होती, पण महायुतीत अमरावतीची जागा ही राष्‍ट्रवादीकडे गेल्‍याने जगदीश गुप्‍ता यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्‍यांनी उमेदवारी अर्जाची उचल केली आहे. ते उमेदवारी अर्ज भरतात का आणि रिंगणात कायम राहणार का, याची उत्‍सुकता राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा : भाजपाच्या ८० आमदारांना पुन्हा तिकीट; उमेदवारी देताना भाजपाने यावेळी अधिक खबरदारी का घेतली?

अमरावतीत आता काँग्रेस आणि भाजप यांच्‍यातील परंपरागत लढत यावेळी दिसणार नाही. गेल्‍या वेळी काँग्रेसच्‍या उमेदवार असलेल्‍या सुलभा खोडके यांच्‍या विरोधात काँग्रेसचा उमेदवार असे चित्र पहायला मिळणार आहे. जगदीश गुप्‍ता यांनी लढत देण्‍याचा निर्णय घेतला, तर ही निवडणूक रंजक वळणावर पोहचणार आहे. याशिवाय मनसेचे पप्‍पू पाटील यांनीही निवडणूक लढण्‍याची तयारी केली आहे.