अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षात चुरशीची लढत होत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी गेली पाच वर्षे केंद्र सरकारला दिलेला पाठिंबा, भाजपमध्ये नाट्यमय प्रवेश, लगेच उमेदवारी आणि जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दिलासा, यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या राणांना जनतेच्या न्यायालयात अग्निदिव्य पार करावे लागणार आहे. गेल्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतपेढीचा आधार त्यांना मिळाला होता. आता भाजपच्या परंपरागत मतांखेरीज विविध जात समूहांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांना जोरदार प्रयत्न करावे लागत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती मतदारसंघात ३७ उमेदवार रिंगणात असून बहुसंख्य कुणबी-मराठा मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नवनीत राणा यांना गेल्या निवडणुकीत ५ लाख १० हजार ९४७ मते (४५.८७ टक्के) मते मिळाली होती. मोदी लाटेतही अपक्ष म्हणून निवडून आल्याने त्यांचे कौतुकही झाले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ४ लाख ७३ हजार ९९६ मते (४२.५५ टक्के) प्राप्त झाली होती. आनंदराव अडसूळ महायुतीत असूनही राणांसोबत नाहीत. तर महायुतीचे घटक असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने राणांविरोधात दिनेश बुब यांना रिंगणात आणले आहे.

शिवसेनेच्या ताब्यातील ही जागा मिळावी, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न चालवले होते. त्यात त्यांना यश आले आणि काँग्रेसने दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी दिली.

अमरावतीत प्रखर हिंदुत्वाचे राजकारण गेल्या काही वर्षांत बळावले. नवनीत राणा यांनी त्यावर स्वार होत जनाधार वाढवण्याचा प्रयत्न चालवला. चांगला जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू. काँग्रेसच्या कार्यकाळात मंजूर झालेला बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना पूर्णत्वास जाणे, अमरावतीत पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या उभारणीची घोषणा त्यांच्यासाठी अनुकूल ठरत असली, तरी जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांशी वैरत्व, पक्षांतर्गत नाराजी, दलित आणि मुस्लिमांचा निसटलेला जनाधार या बाबी त्यांच्यासाठी अडचणीच्या बनल्या आहेत.

हेही वाचा… बॉलीवूड रॅपर, सापाच्या तस्करी प्रकरणात नाव आणि आता लोकसभेची उमेदवारी

काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची हक्काची मतपेढी तयार आहे. दलित, मुस्लिमांच्या पाठिंब्यासोबतच कुणबी मतदार वानखडे यांच्या पाठीशी असल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा आहे. संयमी राजकारण ही वानखडे यांची जमेची बाजू आहे.

ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपांनी गाजत आहे. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील संघर्ष निवडणूक काळात चव्हाट्यावर आला. वैयक्तिक पातळीवर टीका केली जात आहे. प्रहारचा प्रचार आक्रमक आहे, तर काँग्रेसने पदयात्रांच्या माध्यमातून ‘मतदार जोडो’ मोहीम हाती घेतली आहे. बुथ पातळीवर योग्य नियोजन केल्याचा भाजपचा दावा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा कितपत प्रभाव पडेल, याची उत्सुकता आहे. संभाव्य मतविभागणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बच्चू कडूंचा राणांना विरोध

महायुतीत असूनही आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याच्या विरोधात दंड थोपटले. नवनीत राणा यांना पराभूत करणे, हाच आपला अजेंडा असल्याचे ते सांगतात. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिनेश बुब हेही राणा विरोधक. उमेदवारी न मिळाल्याने ते बच्चू कडूंच्या सोबतीला गेले. तेही विजयाचा दावा करीत आहेत. रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजकार्य ही त्यांची ओळख. बच्चू कडूंसाठी ही निवडणूक मात्र परीक्षाच ठरणार आहे.

वाचा सविस्तर… नवरा तुरुंगात, बायको निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत श्रीकला रेड्डी?

जातीय समीकरणे

मतदारसंघात कुणबी-मराठा बहुसंख्य आहेत. त्याखालोखाल माळी, तेली या जातसमूहांची मतदारसंख्या मोठी आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात हिंदूंचे प्रमाण हे ५२.७३ टक्के, मुस्लिमांचे १३.३१ टक्के, बौद्ध १७.४३ टक्के आणि इतर १६.४३ टक्के अशी स्थिती आहे. यावेळी कुणबी मतांचे विभाजन कशा पद्धतीने होते, यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. मुस्लीम मतेही या मतदारसंघात निर्णायक आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati lok sabha election 2024 constituency overview navneet rana bacchu kadu bjp print politics news asj