ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही प्रभावी पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही भाजपने विद्यमान आमदार संजय केळकर यांना पुन्हा एकदा ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवून शिंदेसेनेच्या दबावाला फारसे जुमानले नाही. केळकर यांनीही पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांचा ‘अनुभव’ लक्षात घेऊन उमेदवारी जाहीर होताच तातडीने शिवसैनिकांसाठी दैवत मानल्या जाणाऱ्या आनंद दिघे यांच्या समाधीस्थळाकडे धाव घेतली. केळकर यांच्याविरोधात शिवसेनेत (शिंदे) बंडाची भाषा केली जात असताना दिघे यांच्या समाधीस्थळाकडे धाव घेत केळकर यांनी पद्धतशीरपणे राजकीय आखणी केल्याची चर्चा आता रंगली आहे.

संजय केळकर हे राज्यातील सत्ताधारी महायुतीचे आमदार असले तरी ठाण्यातील महापालिकेत सत्ताधारी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत असा आजवरचा अनुभव आहे. शहरातील बेकायदा बांधकामे असोत, समूह विकास योजनेतील वादग्रस्त तरतूदी असोत किंवा कंत्राटातील कथीत गैरव्यवहारांच्या मुद्द्यावर केळकर नेहमीच आक्रमक भूमिका घेताना दिसतात. केळकर यांची ही जाहीर भूमिका शिंदेसेनेतील अनेक नेत्यांच्या जिव्हारी लागते असा अनुभव आहे. लोकसभा निवडणुका होताच ठाणे विधानसभा क्षेत्रात केळकर यांच्याऐवजी दुसरा उमेदवार दिला जावा असा सूर शिंदेसेनेत दबक्या आवाजात उमटू लागला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही काही पदाधिकाऱ्यांनी केळकर यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. बाळकूम भागातील प्रभावी राजकीय प्रस्थ देवराम भोईर, संजय भोईर यांच्या कुटुंबियांनी तर ‘त्यांना पाडू’ अशी भूमीका जाहीरपणे मांडली होती. या पार्श्वभूमीवर उमेदवारी जाहीर होताच केळकर यांनी दिघे यांच्या समाधीस्थळाला दिलेल्या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपच्या माजी नगरसेवकाचे भावी आमदार फलक झळकले

पाच वर्षांपूर्वीचा ‘कटु’ अनुभव

पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे अविनाश जाधव यांना केळकर यांच्याविरोधात ७० हजारांहून अधिक मते घेतली होती. भाजप-शिवसेना युतीचा बालेकिल्ला असूनही शेवटच्या टप्प्यात केळकर यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. जाधव यांना मिळालेल्या मतांमध्ये केळकर यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांचा ‘मनसे’ वाटा होता अशी चर्चाही त्यावेळी रंगली होती. आमदार म्हणून निवडून आल्यावर केळकरांनी ठाणे महापालिकेतील अनियमित कारभाराविषयी नेहमीच जोरदार भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर यंदा निवडणुकांना सामोरे जाताना केळकर सुरुवातीपासूनच सतर्क झाल्याची चर्चा आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती. या निवडणुकीत शिवसेनेकडून रविंद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपने संजय केळकर यांना उमेदवार केले होते. या निवडणुकीत संजय केळकर यांनी सुमारे १२ हजार मतांनी रविंद्र फाटक यांचा पराभव केला होता. ठाणे विधानसभा मतदारसंघावर अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. रविवारी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत संजय केळकर यांचे नाव पाहायला मिळाले. उमेदवारी जाहीर होताच, संजय केळकर हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे समाधीस्थळी म्हणजेच, शक्तिस्थळावर गेले. यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकारी केळकर यांच्यासोबत दिसले नाहीत.

हेही वाचा – मुनगंटीवार सातव्यांदा, भांगडिया तिसऱ्यांदा रिंगणात; राजुरा, चंद्रपूर, ब्रह्मपुरी व वरोरातील उमेदवाराची प्रतीक्षा

आनंद दिघे आणि आमचे स्नेहाचे संबंध होते. आनंद दिघे हे नेहमी राजकारण एकाबाजूला आणि व्यक्तीगत संबंध एकाबाजूला ठेवत. यशाची १०० टक्के खात्री म्हणजे आनंद दिघे होते. हे त्यावेळी आम्ही पाहिले आहे. त्यामुळे त्यांचे स्मरण करावे वाटते. त्यामुळे त्यांच्या शक्तिस्थळावर नतमस्तक होण्यासाठी गेलो. – संजय केळकर, भाजप, उमेदवार, ठाणे विधानसभा.