मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचा पहिल्या पसंतीचा उमेदवार असूनही आणि मतांच्या गणितात विजयाची खात्री असतानाही चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या सामाजिक न्यायाच्या चेहऱ्यावर जात वर्चस्वाचा ओढलेला तो ओरखडा होता. काँग्रेस पक्षाने आता हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेली चूक दुरुस्त करण्याचा, हंडोरे यांना राजकीय न्याय देण्याचा आणि आपल्या चेहऱ्यावरील जातवर्चस्वाचा ओरखडा पुसून टाकण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने त्यावेळी आंबेडकरी चळवळीतील एक धडाडीचे कार्यकर्ते, त्यानंतर काँग्रेसचे आमदार, मंत्री राहिलेले चंद्रकांत हंडोर व भाई जगताप यांना उमेदवारी दिली होती. हंडोरे हे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. परंतु मतदानाच्या वेळी चक्रे फिरली आणि हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाला. भाई जगताप मात्र आश्चर्यकारकरित्या विजयी झाले. हंडोरे यांना उमेदवारी देऊन दलित समाजाची सहानुभूती मिळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता, असा प्रयत्न त्या पक्षाचा कायमच राहिला आहे. सामाजिक न्यायाची भूमिका घेणारा पक्ष असा पक्षाचा चेहराही लोकांसमोर त्यांना आणायचा होता. परंतु हंडोरे यांच्या पराभवाने काँग्रेसच्या सामाजिक न्यायाच्या चेहऱ्यावरच पक्षांतर्गत जातवर्चस्वाचा ओरखडा ओढला गेला.

हेही वाचा – नांदेड जिल्ह्यातील दोघांना खासदारकी ! ‘अपेक्षित’ अशोकराव, ‘अनपेक्षित’ डॉ. अजित गोपछेडे, पंकजा मुंडे यांच्या नावासमोर पुन्हा फुली

या पराभवाचा हंडोरे यांना धक्का बसलाच, परंतु पक्षश्रेष्ठींकडूनही त्याची गंभीर दखल घेतली गेली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे एकेकाळी प्रभारी राहिलेले मोहन प्रकाश यांची चौकशी समिती नेमली होती. समितीने आपला अहवाल पक्षश्रेष्ठींना दिला होता. परंतु ज्यांनी कुणी हंडोरे यांना दगाफटका केला, त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा हंडोरे यांना न्याय देण्यासाठी येणाऱ्या योग्य संधीची वाट पाहणे, ही भूमिका काँग्रेसने घेतली.

आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते म्हणून हंडोरे यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई आहे. ते मुरब्बी राजकारणीही आहेत. १९८५ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून येऊन त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने काँग्रेसबरोबर युती केल्यानंतर १९९२ मध्ये हंडोरे मुंबई महापालिकेचे महपौर झाले. पुढे रिपब्लिकन राजकारणातून ते प्रस्थापीत काँग्रेसी राजकारणात आले. २००४ मध्ये ते चेंबूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आणि कॅबिनेट मंत्रीही झाले. २००९ मध्ये पुन्हा ते विधानसभेवर निवडून गेले. परंतु पुढचा कालखंड त्यांना आमदार म्हणूनच पार पाडावा लागला, त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तरी पक्षसंघटनेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ते पुढे प्रदेश कार्याध्यक्ष अशी पदे त्यांना देण्यात आली. पक्षसंघटेनत त्यांना महत्व व मानसन्मान देण्यात आला, परंतु विधान परिषद निवडणुकीत त्यांचा घात झाला. तो पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. ते काहीसे अस्वस्थ होते. त्यामुळे इतर राजकीय पर्यायाच्या ते शोधात असल्याची चर्चा होती. परंतु काँग्रेस पक्षाने त्यांना आता राज्यसभेची उमेदवार देऊन झालेली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाच – काँग्रेसमधून फुटल्याचे बक्षीस, पण अशोक चव्हाण राज्याच्या राजकारणाच्या चाकोरीबाहेर

हंडोरे यांना उमेदवारी देऊन आगामी लोकसभा निवडणुकीत दलित समाजाची सहानुभूती मिळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अर्थात हंडोरे यांना विजयी करणे तितकेच महत्त्वाचे आहे आणि ती काँग्रेसची जबाबदारी आहे. कारण राजकारणात कधी काही घडेल हे सांगता येत नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An attempt to erase the scratch of caste supremacy on the face of congress print politics news ssb
Show comments