लोकसभेतील अपयशाबद्दल भाजप व संघ परिवाराकडून सातत्याने दोष दिला जात असल्याने अस्वस्थ असलेले राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने राष्ट्रवादी महायुतीत समाधानी नाही हाच संदेश गेला आहे. पण, स्वबळाचा नारा दिल्याने पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांना आतापासूनच बळ मिळेल हे गणित असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या गोटातून करण्यात येत आहे.
भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट महायुतीत तर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीतून लढतात. या सहा पक्षांमध्ये स्वबळावर लढण्याची सर्वात प्रथम घोषणा ही अजित पवार यांनी केली आहे. विधानसभा निवडणूक महायुतीत लढणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. पण त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून भाजपलाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. पक्ष वाढीसाठी अजित पवारांनी ही घोषणा केल्याचे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याकडून सांगण्यात आले.
हेही वाचा…कारण राजकारण: राऊत यांच्यासमोर जुन्या सहकाऱ्यांचे आव्हान?
लोकसभा निवडणुकीत आधी आठ ते दहा जागांची मागणी अजित पवारांनी केली होती. मग सहा ते आठ जागा मिळाव्यात अशी मागणी केली. महायुतीत फक्त चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या. तेव्हाच भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फारसे महत्त्व देत नाही हे स्पष्ट झाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीची राज्यमंत्रिपदी बोळवण करण्यात आली होती. पण प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळाले पाहिजे यावर राष्ट्रवादीचे नेते ठाम होते. राष्ट्रवादीने दर्जाचे मंत्रिपद नसेल तर थांबण्याची भूमिका घेताच भाजपने फारसे गांभीर्याने घेतले नाही. एकमेव खासदार आणि पाच आमदार असलेल्या बिहारमधील जनीतप्रसाद मांझी यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. पण ४० पेक्षा जास्त आमदार असलेल्या राष्ट्रवादीचा विचारही केला गेला नाही ही बाब राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला खुपत आहे. विधानसभेसाठी राष्ट्रवादीने ८० जागांची अपेक्षा केली असली तरी एवढ्या जागा भाजप सोडणार नाही हे स्पष्टच आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत राज्यातील अपयशाबद्दल भाजप आणि रा.स्व. संघाच्या विचारांच्या नियतकालिकांमधून अजित पवार यांच्यावर खापर फोडण्यात येत असल्याने राष्ट्रवादीचे नेते अस्वस्थ आहेत. ‘ध्येय प्राप्तीसाठी तह आणि सलगी करावी लागते’ हे पुण्याच्या अधिवेशनातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानही राष्ट्रवादी किंवा अजित पवारांसाठी बोलके आहे.
हेही वाचा…नुकसानीच्या भीतीने भाजपची नितेश राणेंना चपराक?
राष्ट्रवादीचा विस्तार करायचा असल्यास कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते. महायुतीतून लढणार हे जाहीर केल्यास जागावाटपात मर्यादा येतात. यामुळे कार्यकर्ते सैरभैर होतात. स्वबळाचा नारा दिल्याने जागोजागी कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागतील, असे अजित पवार आणि पक्षाच्या नेत्यांचे मत आहे. यातूनच विधानसभेपूर्वीच स्वबळाचा नारा देत अजित पवारांनी पक्ष वाढीसाठी आतापासूनच पावले टाकली आहेत.