आसाराम लोमटे
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जेव्हा स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढले तेव्हा परभणीतून भाजपने २०१४ साली आनंद भरोसे या तरुण नेतृत्वाला संधी दिली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण ही निवडणूक त्यांनी जिद्दीने लढवली. निवडणुकीआधी ते काँग्रेस पक्षात क्रियाशील होते. एका टप्प्यावर त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला आणि पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. भारतीय जनता पक्षात आलेले भरोसे आता पक्षात चांगलेच स्थिरावले आहेत. शिक्षण, शेती, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवे उपक्रम हाती घेणाऱ्या भरोसे यांनी आता स्वतःची ओळख निर्माण केली आहे. कृषी शास्त्रात पदवीधर असलेल्या भरोसे यांचा व्यवसाय शेती हा आहे.
२००१ साली असोला या त्यांच्या गावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीपासून त्यांची वाटचाल सुरू झाली. पुढे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्यांनी दहा वर्षे प्रतिनिधित्व केले. उपसभापतीपदाची संधीही त्यांना त्या काळात मिळाली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी विजय संपादन केला. २००७ साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले. या सर्व सत्तास्थानावर काम करत असताना त्यांचा संपर्क वाढत गेला. त्यांची तोपर्यंतची ही सर्व वाटचाल काँग्रेस पक्षातली होती. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपवली. आज पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडत आहेत.
हेही वाचा… राहुल चिकोडे : ध्येयवादी व्यक्तिमत्व
राजकीय जीवनात काम करत असताना युवावस्थेपासून भरोसे यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. क्रिकेट स्पर्धेपासून ते कृषी महोत्सवापर्यंत अनेक उपक्रमांचा यात समावेश आहे. त्यांनी आतापर्यंत भरवलेल्या संजीवनी कृषी महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कृषी क्षेत्रातील विविध उत्पादनांचे भव्य प्रदर्शन, चर्चासत्रे असे या महोत्सवाचे स्वरूप असते. आणि या महोत्सवाला शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी असते. राज्यभरातून अनेक लोक यात सहभागी होतात. विविध दालनांचा सहभाग असतो. अनेक क्षेत्रातले तज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येतात. कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळते. त्यांचा हा उपक्रम आता वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.
हेही वाचा… राजेश्वर चव्हाण : एकनिष्ठ नेते
करोनाच्या काळात जेव्हा अनेक कष्टकऱ्यांचे हाल झाले तेव्हा गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. विशेषतः पालावर राहणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या कुटुंबीयांपर्यंत त्यांनी ही मदत पोहोचवली. यात कुटुंबाला लागणारे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. . दरवर्षी पाच लाख रुपयांहून अधिक बक्षिसे असलेली क्रिकेट स्पर्धा ते तरुणांसाठी भरवतात.