मुंबई : ‘धर्मवीर’ या चित्रपटातून आनंद दिघे यांचे कार्य प्रेक्षकांसमोर आणले. पण त्यांचे काम एवढे मोठा आहे की एका चित्रपटात दाखवू शकत नाही म्हणून दुसरा भाग काढल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगितले.
‘धर्मवीर- २’ या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. या चित्रपटाच्या माध्यमातून धगधगता भूतकाळ प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार आहे. आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल टाकून नाही तर त्यांच्या जीव ओतून काम करण्याचा कृतीनुसार आम्ही प्रयत्न करत आहोत. हिंदुत्वाचे नाही तर संपूर्ण समाजाचे रक्षण आनंद दिघे यांनी केले होते. त्यांच्याकडे कोणत्याही धर्म, जात, पंथाचा गरजू येऊ दे तो कधी निराश व्हायचा नाही. असा एकही गरजवंत नव्हता ज्याला दिघे यांनी मदत केली नाही, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>मुंबई अदानींचे शहर होऊ देणार नाही! उद्धव ठाकरे यांचा इशारा; ‘धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच’
गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरूचे माहात्म्य सांगणाऱ्या ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मंगलप्रभात लोढा, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार, खासदार श्रीकांत शिंदे, अभिनेता सलमान खान, जितेंद्र, महेश कोठारे, अशोक सराफ, गोविंदा आदी उपस्थित होते. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रसिद्ध होणार आहे.
‘ज्या गुरूने एकनाथ शिंदे यांच्यासारखा नेता घडवला अशा आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित दुसऱ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दिघे यांच्या शिकवणीप्रमाणे शिंदे यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे ते पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिघे नक्कीच स्वर्गातून आशीर्वाद देत असतील, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.