जम्मू-काश्मीर काँग्रेस कमिटीचे नेतृत्व सांभाळणाऱ्या गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिल्यानंतर काहीच दिवसांत पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनीही हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी नेमलेल्या संचलन समितीच्या अध्यक्षपदाचा त्याग केला आहे. कॉँग्रेसच्या अध्यक्ष निवडीसाठी फार थोडा अवधी उरला असताना जी २३ समूहाच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.
शर्मा यांचे पदभार सोडतानाचे ‘टायमिंग’ चोख असल्याची कुजबूज आहे. शर्मा यांनी दिलेला राजीनामा आणि आझाद यांनी प्रचार समितीचे सोडलेले अध्यक्षपद म्हणजे ‘निव्वळ योगायोग’ नसल्याचेही जी २३ संलग्न काही नेत्यांचे म्हणणे आहे.
“तुम्हाला हा निव्वळ योगायोग वाटतोय का? वाऱ्याच्या झोतात पेंढयातील तूस आहे.. लवकरच सगळी पोलखोल होईल,” असे वरिष्ठ पक्ष नेते सांगतात. वारंवार होणारा अपमान, त्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि मुद्दाम महत्त्वाच्या पदावर न होणारी नियुक्ती याला कंटाळून शर्मा यांनी राजीनामा दिल्याचे त्यांचे निकटवर्ती सांगतात. “हा सर्व प्रकार एआयसीसीच्या धोरणाचा भाग आहे” असे पक्ष नेत्याने सांगितले.
शर्मा हे कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपला राजीनामा निर्णय कळविण्यासाठी लिहिलेल्या पत्रात नमूद करतात की, “मला हिमाचल कॉँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकांना, अलीकडे दिल्ली व सिमल्यात संपन्न झालेल्या निवडणूक रणनिती आणि तयारी संबंधी वार्तालापांना उपस्थित राहण्याविषयी कोणतीही माहिती दिली जात नाही किंवा आमंत्रण नसते.”
“हिमाचल निवडणुकीकरिता कॉँग्रेस पक्षाच्या संचलन समितीच्या अध्यक्षपदाचा मी अत्यंत खिन्न मनाने राजीनामा देतो आहे. मी जिवंत असेपर्यंत मनाने कॉँग्रेसी असणार आहे आणि मी निश्चयाचा पक्का आहे. कॉँग्रेस पक्षाचा विचार माझ्या रक्तात भिनलेला आहे. याविषयी मनात कोणतीही शंका नसावी. मात्र वारंवार मला डावलण्यात आल्याने आणि अपमानास्पद वागणूक मिळाल्याने, स्वाभिमानी व्यक्ती म्हणून माझ्याकडे कोणताही पर्याय उरला नाही,” असे ट्विट शर्मा यांनी केले.
एप्रिल महिन्यात हिमाचल प्रदेशाकरिता नेमण्यात आलेल्या १० सदस्यीय समितीचे अध्यक्ष म्हणून शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये पंजाबच्या माजी एआयसीसी प्रभारी आशा कुमारी संयोजक होत्या आणि कौल सिंह ठाकूर, राम लाल ठाकूर, हर्षवर्धन चौहान आणि धनी राम शांडिल या ज्येष्ठ नेत्यांचा सदस्य म्हणून समावेश होता. पीसीसी अध्यक्ष, सीएलपी नेते आणि प्रचार समितीचे प्रमुख हे समितीचे स्थायी निमंत्रक होते.