प्रमोद खडसे
वाशीम : जिल्ह्यातील रिसोड-मालेगाव विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो. मागील अनेक वर्षांपासून या मतदार संघावर झनक कुटुंबाचे वर्चस्व कायम आहे. मात्र, एकेकाळचे काँग्रेसचे मातब्बर नेते, माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे येथील राजकीय परिस्थिती आता बदलली आहे. देशमुखांमुळे भाजपची मतदार संघातील ताकद वाढली असून काँग्रेससमोरील आव्हानात भर पडली आहे.
जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी रिसोड-मालेगाव विधानसभा मतदार संघ हा अकोला लोकसभा मतदार संघात येतो. या मतदार संघावर काँग्रेसचे, विशेषत: झनक कुटुंबाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यांवर अनंतराव देशमुख यांचा सर्वाधिक प्रभाव आहे. एकेकाळी केवळ रिसोड-मालेगाव विधानसभाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष होता. मात्र, काँग्रेसने देशमुख यांना बळ देण्याऐवजी त्यांना सातत्याने डावलले. यामुळे देशमुखांनी काँग्रेस सोडली. तेव्हापासून काँग्रेसचा राजकीय आलेख कमी होत गेला. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर देशमुख यांनी जनविकास आघाडीची स्थापना केली.
यानंतर जनविकास आघाडीने आपली ताकद दाखवून दिली. सद्यस्थितीत देशमुख यांचे ७ जिल्हा परिषद सदस्य आहेत. रिसोड पंचायत समितीमध्ये ७ तर मालेगाव पंचायत समितीमध्ये ६ पंचायत समिती सदस्य आहेत. रिसोड नगर पालिकेवरदेखील देशमुखांची एकहाती सत्ता होती. सध्या तेथे प्रशासक आहेत. खरेदी विक्री, बाजार समित्यांवरही देशमुख यांचे वर्चस्व आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देशमुख अपक्ष लढले होते. त्यावेळी त्यांना ६७ हजार ७३४ मते मिळाली होती, तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अमित झनक यांना ६९ हजार ७५ मते मिळाली होती. अवघ्या काही मतांनी देशमुख यांचा पराभव झाला होता.
अनंतराव देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. आता रिसोड-मालेगाव मतदार संघात देशमुखांमुळे भाजपचे पारडे जड झाले असून काँग्रेससमोरील आव्हानात भर पडली आहे. पुढील महिन्यात काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षातील आणखी काही आजी-माजी पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देशमुख स्वत: लढतात की पुत्र ॲड. नकुल देशमुख यांना मैदानात उतरवतात, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.