आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय एस शर्मिला यांनी नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर त्यांना आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. दरम्यान लोकांशी संपर्क साधण्यासाठी तसेच राज्यातील काँग्रेसची स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी आपला दौरा सुरू केला आहे. त्या राज्यातील सर्व जिल्ह्यांत जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
प्रदेशाध्यक्षपद मिळताच भावावर टीका
आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर शर्मिला यांनी त्यांचे बंधू जगनमोहन रेड्डी यांच्यावर सडकून टीका केली. जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशला आर्थिक संकटाकड घेऊन जात आहेत. मी माझे वडील वाय एस आर रेड्डी (आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री) यांच्या पावलावर पाऊल ठेवणार आहे, असे शर्मिला म्हणाल्या होत्या.
शर्मिला यांच्या दौऱ्याला सुरुवात
शर्मिला आंध्र प्रदेशच्या एकूण ९ दिवसांच्या दौऱ्यावर असणार आहेत. आपल्या या प्रवासादरम्यान त्या एकूण २६ जिल्ह्यांतून जाणार आहेत. या दौऱ्याला इच्छापूरमपासून सुरुवात झालेली आहे. या दौऱ्याची सांगता कडापा जिल्ह्यातील इदुपुलापाया येथे होणार आहे. मंगळवारी (२३ जानेवारी २०२४) शर्मिला यांनी या दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्याची सुरुवात करताना त्या इच्छापूरमध्ये येथे बसमधून पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या ताफ्यातून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्यासोबत तेलंगणा प्रदेश समितीचे माजी प्रमुख माणिकराव ठाकरे तसेच आंध्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिदुगू रुद्र राजू आणि रघुवीरा रेड्डी तसेच आदी नेते असतील.
पक्षाला नवसंजीवनी देण्याचा शर्मिला यांचा प्रयत्न
वायएसआर काँग्रेसमध्ये असताना शर्मिला यांनी बंधू जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी प्रचार केला आहे. या प्रचारासाठी त्यांनी अनेकवेळा संपूर्ण राज्याचा दौरा केलेला आहे. मात्र आता शर्मिला या काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे आपल्या दौऱ्याच्या मदतीने त्या काँग्रेचा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. ज्या भागात वायएसआर काँग्रेस तसेच टीडीपी आणि जन सेना पार्टी या पक्षांचे प्राबल्य आहे, त्या भागात काँग्रेसचा जनाधार वाढवण्यासाठी शर्मिला विशेष प्रयत्न करणार आहेत.
कार्यकर्त्यांकडून जनसंपर्कास सुरुवात
आंध्र प्रदेशच्या २६ जिल्ह्यांत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. वायएसआर यांना मानणारे जे नेते काँग्रेस सोडून गेलेले आहेत, त्यांना परत काँग्रेसमध्ये बोलावण्यासाठी या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. “वायएसआर यांच्याशी प्रामाणिक असणाऱ्यांना काँग्रेसमध्ये परतण्याची ही नामी संधी आहेत. वायएसआर यांच्या विचारांचे राज्य आणण्याची ही एक संधी आहे,” असे आपल्या दौऱ्याची घोषणा करण्याआधी शर्मिला म्हणाल्या.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी करणार चर्चा
आपल्या या दौऱ्यादरम्यान शर्मिला आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. २६ जिल्ह्यांतील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून काँग्रेसला नवसंजीवनी कशी देता येईल, यावर त्या चर्चा करणार आहेत.
भावातर्फे पोटनिवडणुकीसाठी राज्यभर दौरा
शर्मिला यांचा हा पहिलाच दौरा नाही. बंधू जगनमोहन रेड्डी यांना सीबीआयने अटक केल्यानंतर जून २०१२ मध्ये शर्मिला यांनी आपल्या भावातर्फे पोटनिवडणुकीसाठी राज्यभर दौरा केला होता. २०१२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात शर्मिला यांनी पदयात्रा आयोजित केली होती. या यात्रेमध्ये त्यांनी इदुपुलापायापासून इच्छापूरमपर्यंत ३ हजार किमीचा प्रवास केला होता.
प्रचारासाठी ११ दिवसांची बसयात्रा
२०१९ सालच्या निवडणुकीतही शर्मिला यांनी वायएसआर काँग्रेसच्या प्रचारासाठी ११ दिवसांची बसयात्रा काढली होती. या यात्रेत त्यांनी एकूण दीड हजार किमीचा प्रवास केला होता.
तेलंगणात प्रजाप्रस्थानम यात्रा
आंध्र प्रदेशमध्ये राजकीय विस्ताराची शक्यता नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्या आंध्र प्रदेश सोडून तेलंगणात गेल्या. येथे त्यांनी वायएसआर तेलंगणा या पक्षाची स्थापना केली. एप्रिल २०२१ मध्ये त्या तेलंगणात गेल्या होत्या. २० ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांनी तेलंगणात प्रजाप्रस्थानम यात्रा काढली होती. आपल्या या यात्रेत त्यांनी एकूण ३३ जिल्ह्यांत प्रवास केला. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी आपला वायएसआर तेलंगणा पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जित केला.