आंध्र प्रदेशची विधानसभा निवडणूक अवघ्या ७ महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीसाठी तेथील प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पक्ष कामाला लागले आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा या पक्षांकडून प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, जनसेना पार्टीचे (जेएसपी) प्रमुख तथा अभिनेते के. पवन कल्याण यांनी गुरुवारी (१४ ऑक्टोबर) तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) या पक्षाशी युती करणार असल्याचे जाहीर केले. विद्यमान मुख्यमंत्री तथा वायएसआर काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) पक्षाचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांचा सामना करण्यासाठी आम्ही ही युती केल्याचे त्यांनी सांगितले.
पवन कल्याण यांनी घेतली नायडू यांची भेट
त्यांनी टीडीपी पक्षाचे प्रमुख तथा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची राजमुंद्री येथील मध्यवर्ती कारागृहात जाऊन भेट घेतली. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली ते सध्या तुरुंगात आहेत. नायडू यांच्या भेटीनंतर पवन कल्याण यांनी टीडीपी आणि जेएसपी हे दोन्ही पक्ष आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढवतील, असे जाहीर केले. यावेळी त्यांनी वायएसआरसीपी पक्षाला पराभूत करण्यासाठी भाजपानेही आमच्यासोबत यावे, असे आवाहन केले.
“आगामी निवडणूक जेएसपी आणि टीडीपी हे दोन्ही पक्ष एकत्र लढवतील “
पवन कल्याण यांनी टीडीपी आणि जेएसपी या दोन पक्षांच्या युतीवर अधिक माहिती दिली. “आगामी २०२४ सालची निवडणूक जेएसपी आणि टीडीपी हे दोन्ही पक्ष एकत्र लढवतील. आम्ही वायएसआरसीपी या पक्षाशी स्वतंत्रपणे लढू शकत नाहीत. भाजपानेही आमच्यासोबत यावे अशी माझी इच्छा आहे. भाजपा आमच्यासोबत येईल अशी अजूनही मला अपेक्षा आहे. भाजपाने याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही,” असे कल्याण म्हणाले. आंध्र प्रदेशला वायएसआरसीपी हा पक्ष परवडणारा नाही. टीडीपी आणि जेएसपी हे दोन्ही पक्ष त्यांच्याविरोधात निवडणूक लढवतील, असेही कल्याण म्हणाले.
“आंध्र प्रदेशमध्ये सत्ताविरोधी जनमत तयार झाले आहे”
पवन कल्याण यांचा पक्ष भाजपा प्रणित एनडीएचा भाग आहे. त्यांना भाजपादेखील टीडीपी, जेएसपीसोबत येईल, अशी अपेक्षा आहे. पवन कल्याण यांनी दिलेल्या या प्रस्तावावर सुरुवातीला भाजपा पक्ष अनुकूल नव्हता. अजूनही या पक्षाने कल्याण यांच्या युतीच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. याबाबत जेपीएस पक्षाचे नेते नदेंदला मनोहर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पवन कल्याण हे भाजपाला युतीत सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. सध्या आंध्र प्रदेशमध्ये सत्ताविरोधी जनमत तयार झालेले आहे. या जनमताचे विभाजन होऊ नये, असे पवन कल्याण यांना वाटते. त्यामुळेच जेएसपी, टीडीपी आणि भाजपा या पक्षांनी एकत्र यावे असे असे ते म्हणत आहेत,” असे मनोहर यांनी सांगितले.
२०१९ सालच्या निवडणुकीचा निकाल काय?
दरम्यान, २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत एूकण १७५ जागांपैकी १५१ जागांवर वायएसआरसीपी पक्षाचा विजय झाला होता. तर २३ जागांवर टीडीपी पक्षाला यश मिळाले होते. जेएसपी पक्ष फक्त एकाच जागेवर विजय मिळवू शकला होता. भाजपाने जुलै महिन्यात दग्गुबती पुरंदेश्वरी यांची आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. त्यांनी पवन कल्याण यांच्या घोषणेवर अद्याप कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.
नायडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुढच्या काही महिन्यांत आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. एप्रिल-मे २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात. याच कारणामुळे तेथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असताना चंद्राबाबू नायडू यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर टीडीपीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सीआयडीने चंद्राबाबू नयाडू यांना आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळातील कथित घोटाळ्यासंदर्भात नंदयाल येथून अटक केली. चंद्राबाबू नायडू २०१४ ते २०१९ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाने नायडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर नायडू यांना राजमुंद्री येथील मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे. विजयवाडापासूनन हा तुरुंग २०० किलोमीटर दूर आहे.
गुन्हा रद्द करण्यासाठी नायडू यांची याचिका
नायडू यांनी त्यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. या याचिकेवर १९ सप्टेंबर सुनावणी होणार आहे. त्याआधी आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाने सीआडीला आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे सीआयडीने चौकशी करण्यासाठी नायडू यांची कोठडी मिळावी, अशी याचिकेच्या माध्यमातून मागणी केली आहे. या याचिकेवर येत्या १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होईल. नायडू यांनी अमरावती अंतर्गत रिंग रोडच्या बांधकामातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणातही अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केलेला असून त्यावरही १८ सप्टेंबर रोजीच सुनावणी होईल.