आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. आंध्र प्रदेशमध्ये याच वर्षी विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. त्यामुळे या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक लढवण्याच्या संधीची शक्यता पाहून येथे वेगवेगळ्या पक्षांतील नेते आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करीत आहेत. नुकतेच विजयवाडाचे खासदार केसिनेनी श्रीनिवास यांनी तेलुगू देसम पार्टीच्या (टीडीपी) सदस्यत्वाचा, तसेच आपल्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केसिनेनी श्रीनिवास यांचा खासदारकीचाही राजीनामा

केसिनेनी श्रीनिवास हे आंध्र प्रदेशमधील एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यांना लोक आदराने नानी म्हणतात. त्यांनी नुकताच टीडीपी पक्षाच्या सदस्यत्वाचा, तसेच आपल्या खासदारकीचाही राजीनामा देऊन, सत्ताधारी वायएसआरसीपी पक्षात प्रवेश केला आहे. वायएसआरसीपीचे प्रमुख तथा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. विशेष म्हणजे त्यांचा पक्षप्रवेश होताच जगनमोहन यांनी त्यांची लोकसभा निवडणुकीसाठी विजयवाडाचे उमेदवार म्हणून घोषणा केली.

“मी आता टीडीपीमध्ये राहू शकत नाही”

केसिनेनी श्रीनिवास यांच्यासह त्यांची मुलगी के. श्वेता यांनीदेखील विजयवाडा महापालिकेच्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनीदेखील आपल्या वडिलांसोबत वायएसआरसीपीत प्रवेश केला आहे. वडिलांनी केलेल्या पक्षप्रवेशानंतर “मी आता टीडीपीमध्ये राहू शकत नाही. मला चंद्राबाबू नायडू यांनी खूप सहकार्य केले. मात्र एक वर्षापासून मी आणि माझ्या वडिलांना असं वाटतंय की, आता टीडीपीला आमची गरज राहिलेली नाही” असे श्वेता म्हणाल्या.

केसिनेनी श्रीकांत आणि केसिनेनी श्रीनिवास यांच्यात लढत?

काही महिन्यांपासून चंद्राबाबू नायडू केसिनेनी श्रीनिवास यांचे बंधू केसिनेनी श्रीकांत यांना अधिक महत्त्व देत होते. हीच सल मनात ठेवून केसिनेनी श्रीनिवास यांनी टीडीपीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता विजयवाडा या मतदारसंघात केसिनेनी श्रीकांत आणि केसिनेनी श्रीनिवास यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. तसेच या जागेवरून भाजपाच्या तिकिटावर वाय. एस. चौधरी हेदेखील निवडणूक लढू शकतात. तसे झाल्यास विजयवाडामध्ये तिहेरी लढत होईल.

व्ही. बालशौरी यांचा राजीनामा

गेल्या काही आठवड्यांत आंध्र प्रदेशमध्ये अनेक नेत्यांनी पक्षबदल केला आहे. मछलीपट्टणमचे खासदार व्ही. बालशौरी यांनी वायएसआरसीपी पक्षाचा राजीनामा दिला असून, ते अभिनेता व राजकीय नेते असलेले के. पवन कल्याण यांच्या जन सेना पार्टीमध्ये (जेएसपी) प्रवेश करणार आहेत. जेएसपी आणि टीडीपी या दोन पक्षांत युती आहे.

अंबाती रायडू यांचा १० दिवसांत यू टर्न

काही दिवसांपूर्वी निवृत्त क्रिकेटपटू अंबाती रायडू यांनी वायएसआरसीपीमध्ये प्रवेश केला होता; मात्र लगेच १० दिवसांनी त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. गुंटूर या लोकसभा मतदारसंघातून स्वत:ला तिकीट मिळेल, असा अंदाज रायडू यांनी बांधला होता. मात्र, जगनमोहन रेड्डी तिकीट देण्याच्या मानसिकतेत नाहीत, हे समजल्यावर रायडू यांनी १० दिवसांत वायएसआरसीपीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

अनेक नेत्यांचा पक्षबदल

अंबाती रायडू यांच्याप्रमाणेच आमदार सी. रामचंद्रय्या यांनीदेखील नुकताच वायएसआरसीपीला राम राम ठोकत टीडीपीमध्ये प्रवेश केला. तसेच वायएसआरसीपीचेच पेनामलुरूचे आमदार के. पार्थसारथी यांनीदेखील तिकीट मिळवण्यासाठी टीडीपीमध्ये प्रवेश केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhra pradesh vijayawada mp kesineni srinivas resign tdp joins ysrcp prd
Show comments