अविनाश कवठेकर

पुणे : जिल्ह्यातील शिवसेना नेते, माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय जाहीर करतानाच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस विशेषत: अजित पवार यांच्याविरोधातील खदखद विजय शिवतारे यांनी मांडली. शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील शिवसेनेला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे.

‘पुरंदरमधून विजय शिवतारे कसे निवडून येतात, हे मी पहातो’, अजित पवार यांचे हे ऑक्टोबर २०१९ विधानसभा निवडणूक प्रचारसमयीचे विधान जिल्ह्यात प्रचंड गाजले होते. अजित पवार यांनी ठरवून शिवतारे यांना पराभूत केले आणि कित्येक वर्ष ताब्यात असलेला पुरंदर विधानसभा मतदार संघ गमावण्याची वेळ शिवसेनेवर आली. त्यानंतर पुरंदर विधानसभा मतदार संघाबरोबरच जिल्ह्यातील अन्य मतदार संघातील शिवसेनेची ताकद कमी करण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असल्याच्या तक्रारी शिवसैनिक आणि अन्य पदाधिकाऱ्यांकडून सुरू झाल्या.

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आणि अजित पवार यांचे वैर जिल्ह्याला माहीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवित आहे, अशी तक्रारी राज्यमंत्री शिवतारे यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील नेत्यांनी शिवसंपर्क अभियानात यापूर्वीच केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसबरोबर आघाडी नको, अशी स्पष्ट भूमिकाही मांडण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह बंड पुकारल्यानंतर मात्र जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी थेट पक्षाविरोधातच भूमिका मांडली.

जिल्ह्यातील सोमेश्वर कारखाना, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) समिती, जिल्हा बँक अशा तीन निवडणुका अलीकडच्या वर्षात झाल्या. या तिन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेला बाजूला ठेवले. याचाच अर्थ जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचे पद्धतशीर प्रयत्न झाले आहेत, असा आरोप शिवतारे यांनी केला आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ बारामतीला पळविण्यात आला. गुंजवणी धरणाचे पाणी बारामतीला पळवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पुरंदर तालुक्यातील दिवे येथील प्रस्तावित असलेला राष्ट्रीय बाजारही राष्ट्रवादी काँग्रेसने रद्द करून यशवंत सहकारी साखर कारखान्याची जागा निश्चित केली. हवेली तालुक्यातील फुरसुंगी-उरुळी पाणी नियोजन रखडवली, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दादागिरीची उदाहरणे देत जिल्ह्यात शिवसेना कमकुवत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहे, असा आरोप शिवतारे यांनी केला आहे.

पाहा व्हिडीओ –

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचे धक्के राज्यातील सर्वच जिल्ह्यात बसले असताना पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील शिवसेनेत प्रारंभी कोणतीही अस्वस्थता दिसली नव्हती. शिवसेनेच्या पुण्यातील आघाडीवर सारे कसे शांत असेच वातावरण होते. शहरातील आठ, पिंपरीतील तीन आणि जिल्ह्यातील दहा अशा एकूण एकवीस आमदारांपैकी एकही आमदार शिवसेनेचा नाही. जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, पुरंदर, भोर या पाच, तर पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी विधानसभा मतदारसंघाची एक अशा एकूण सहा जागा शिवसेनेकडून लढविण्यात आल्या होत्या. या सहाही जागांवर शिवसेनेचा पराभव झाला होता. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या वाढत गेल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांची अवस्थता वाढत गेली आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसबरोबर सत्ता नकोच, अशी भूमिका घेण्यास सुरुवात झाली. शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला केला. महाविकास आघाडीच्या नावाखाली पुणे जिल्हातून शिवसेनेला संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. गावागावांत शिवसैनिकांवर अन्याय होतो आहे. प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्र्यांना सांगता येत नाही, अशी व्यथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच आढळराव यांचा रोख होता. शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यात त्यांनी राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या विरोधात होणाऱ्या कुरघोडीच्या राजकारणाचा पाढाच वाचला होता. आता माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात उघड भूमिका घेतल्यानंतर जिल्हयात शिवसेनेला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे यांच्यासोबतच राहीन, अशी भूमिका मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली असली तरी त्यांचीही राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात तक्रार असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे तेही राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात भूमिका जाहीर करतील, अशी चर्चा सध्या आहे.

Story img Loader