प्रबोध देशपांडे

मेळघाटातील पाचडोंगरी, कोयलारी गावात जलजन्य आजारांमुळे चार गावकऱ्यांना प्राण गमवावे लागले. दूषित पाणी पिल्याने शेकडो गावकऱ्यांना बाधा झाली. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी दौऱ्यावर आलेल्या खासदार नवनीत राणा यांना विहिरीतील दूषित पाणी देत आपला रोष व्यक्त केला.

मेळघाटातील पाचडोंगरी, कोयलारी या गावांच्या पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा वीज देयक न भरल्याने खंडित करण्यात आला. त्यामुळे लोकांनी परिसरातील विहिरींमधून पिण्यासाठी पाणी वापरले. या खुल्या विहिरीतील पाणी दूषित असल्याने शेकडो गावकऱ्यांना अतिसाराची लागण झाली. अनेक रुग्णांमध्ये तर पटकीची (कॉलरा) लक्षणे आढळून आली आहेत. या गावातील चार गावकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

हेही वाचा- सत्तार व शिरसाठ यांच्यात पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच

नुकताच खासदार नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत पाचडोंगरी गावाला भेट दिली. ज्या विहिरीतून गावकऱ्यांनी पिण्यासाठी पाणी आणले, त्या विहिरीजवळ त्या पोहोचल्या. नवनीत राणा या गावकऱ्यांशी चर्चा करीत असतानाच काटकुंभ येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश राठोड यांनी विहिरीतील पाणी एका ग्लासात आणले. ते नवनीत राणा यांना पिण्यासाठी देताच नवनीत राणा संतापल्या. तुम्ही हे पाणी पिऊन दाखवा, असे राणा यांनी म्हटल्यावर गणेश राठोड यांनी आजपर्यंत तर हे पाणी प्यायलोच आहे, मात्र आता तुमच्यासमोरही पिऊन दाखवतो असे सांगत राठोड यांनी ग्लासमधील पाणी सर्वांसमोर पिऊन टाकले. हे पाहून अधिकारी आवाक् झाले.

होही वाचा- शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानावरून राजकीय श्रेयवाद सुरू

गावात कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना हवी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. लोकप्रतिनिधी गावात कधी येत नाहीत. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, अशा तक्रारींचा पाढा गावकऱ्यांनी नवनीत राणा यांच्यासमोर वाचला. सरपंच फोन उचलत नाही, अशी तक्रार गावकऱ्यांनी केली. यावेळी नवनीत राणा यांनी सरपंच बदलण्याचे आश्वासन दिले. पाण्याची एवढी गंभीर समस्या असताना तुम्ही आतापर्यंत फोन का केला नाही, असा प्रश्न राणा यांनी गावकऱ्यांना विचारला.

हनुमान चालिसा वाचून प्रश्न सुटणार नाहीत

खासदार नवनीत राणा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देऊन प्रसिद्धी मिळवली. पण केवळ हुनमान चालिसा वाचून प्रश्न सुटणार नाहीत, अशी प्रतिक्रिया काटकुंभ येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश राठोड यांनी व्यक्त केली आहे. अजूनही मेळघाटातील अनेक गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. विजेचा प्रश्न आहे. गावकऱ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. अशा प्रश्नांकडे खासदारांनी लक्ष दिले पाहिजे. आदिवासी विकासापासून वंचित आहेत. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर धावाधाव करण्यापेक्षा अशा घटना घडूच नयेत, यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा गणेश राठोड यांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader