मोहन अटाळकर

अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करणाऱ्या भाजपने राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘कुणबी-मराठा’ कार्ड खेळत व्यूहरचना केली आहे. विदर्भातील आक्रमक चेहरा म्हणून समोर आलेल्या डॉ. अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपने अनपेक्षित धक्का दिला आहे. डॉ. बोंडे यांचे पुनर्वसन करतानाच कुणबी-मराठा समुदायात जनाधार भक्कम करण्याचा प्रयत्न यातून दिसून आला आहे.

lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
Heritage walk for voting awareness with the help of Municipal Corporation Mumbai print news
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘हेरिटेज वॉक’, महापालिकेचा संस्थेच्या मदतीने अनोखा उपक्रम
Congress city presidents strength for rebellion in Thane
ठाण्यात बंडखोरीला काँग्रेस शहराध्यक्षांचे बळ?

भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या ६२ वर्षीय डॉ. अनिल बोंडे यांनी फडणवीस सरकारच्या काळात कृषिमंत्रीपदही भुषवले आहे. २००९ ते २०१४ या काळात ते मोर्शी मतदार सघांचे अपक्ष आमदार होते, २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते निवडूनही आले. पण २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर स्वस्थ न बसता, डॉ. बोंडे यांनी भाजपच्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर टीकास्त्र सोडले. त्यांची काही वक्तव्ये वादग्रस्त देखील ठरली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटचे मानले जातात.

भाजपने सहा वर्षांपुर्वी डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेवर पाठवून जातीय समीकरणांची खेळी केली होती. आता डॉ. बोंडे यांना उमेदवारी देऊन कुणबी-मराठा समाजामध्ये जनाधार मजबूत करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. डॉ. अनिल बोंडे हे कुणबी (मराठा) समाजाचे आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपने इतर ठिकाणी चांगली कामगिरी केली असताना अमरावती जिल्ह्यात मात्र एकाच जागेवर समाधान मानावे लागले, याचे शल्य अजूनही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. कुणबी-मराठा समाज दूर गेल्याने अमरावती जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारांना फटका बसल्याचा निष्कर्ष भाजपच्या ‘चिंतना’तून काढण्यात आला. त्यामुळे जातीय-धार्मिक धृवीकरणातून मतपेटी मजबूत करण्याचे धोरण भाजपने आखल्याचे दिसून आले आहे.

अमरावती महापालिकेत भाजपची निर्भेळ सत्ता होती. पण, जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेस-शिवसेनेला यश मिळाले होते. जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. अनुकूल स्थिती असतानाही अमरावती जिल्ह्यात भाजपला प्रतिसाद का मिळत नाही, हा प्रश्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पडतो. त्यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या भाजपमधील वाढत्या प्रभावामुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते दुखावलेले असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यामुळे राजकीय संतुलन साधण्यासाठी देखील डॉ. बोंडे यांच्या नावाला पसंती दिली गेली, अशी चर्चा आहे.

अमरावती जिल्ह्यातील कुणबी-मराठा समुदायाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिक लक्ष केंद्रित केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमरावतीतील विभागीय मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला शिवसेनेशी कडवी लढत द्यावी लागणार असल्याने आतापासूनच कुणबी-मराठा कार्डचा वापर करण्याची रणनीती भाजपने आखल्याचे चित्र आहे.