मोहन अटाळकर

माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी देत विदर्भात पक्षसंघटनेला बळ देण्यासाठी आणि जनाधार वाढवण्यासाठी कुणबी-मराठा कार्ड खेळले आहे. पक्षाला अभिप्रेत असलेल्या सोशल इंजिनीअरिंगच्या माध्यमातून केवळ अमरावतीत नव्हे तर विदर्भात पक्षसंघटना बळकट करण्याची गरज व्यक्त करत त्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा मानस अनिल बोंडे यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

प्रश्‍न : गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात अपेक्षित कामगिरी करता आली नाही, यावेळी काय रणनीती असणार आहे?

उत्तर : भाजप सरकारने चांगले काम केलेले असतानाही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात अपेक्षित यश मिळू शकले नाही, हे खरे आहे. निवडणुकीत अनेक पैलू काम करीत असतात, पण येणाऱ्या निवडणुकीत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचणे, पक्षसंघटनात्मक बांधणीकडे प्रकर्षाने लक्ष देण्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यावर भर दिला जात आहे. राज्य सरकारच्या विरोधात लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. वीज भारनियमन, फसवी कर्जमाफी, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात दिरंगाई, तोकडी नुकसानभरपाई, असे अनेक मुद्दे आहेत.

प्रश्न : गेल्या निवडणुकीत भाजपला अमरावती जिल्ह्यात यश का मिळू शकले नाही?

उत्तर : वेगवेगळी कारणे आहेत. भाजप एकजुटीने आणि ताकदीने लढल्यास हमखास विजय मिळू शकतो. कुटुंबातील मतभेद दूर करण्याची गरज आहे. प्रत्येक घरापर्यंत पोहचून केंद्राच्या योजनांची माहिती देणे, पक्षसंघटना अधिक मजबूत करणे ही कामे करावी लागणार आहेत. अमरावती जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी, गुटखा माफिया, वाळू तस्करी, अतिक्रमणे यासाठी राज्य सरकार जबाबदार आहे. त्याविरोधात आवाज उठवावा लागेल. जिल्ह्यात निश्चितपणे यश मिळेल.

प्रश्‍न : राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आपल्या काय भावना आहेत ?

उत्तर : पश्चिम विदर्भासारख्या मागास भागातील एका सामान्य कार्यकर्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली. त्याचा खूप आनंद आहे. ओबीसी समाजाच्या व्यथा सातत्याने मांडणाऱ्या, शेतकरी आणि शेतमजूरांची भाषा बोलणाऱ्या, एका सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी देऊन जो सन्मान दिला आहे, जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत, गरिबांपर्यंत पोहचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहोत.

अनिल बोंडे यांच्या उमेदवारीतून भाजपचे विदर्भात ‘कुणबी-मराठा कार्ड’

प्रश्‍न : राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून निवड ही आपल्यासाठी अनपेक्षित बाब होती का?

उत्तर : राज्यसभेसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत. फळाची अपेक्षा न ठेवता काम करीत राहण्याचा माझा शिरस्ता राहिला आहे. काम करण्याची पद्धत, जनसंपर्क याविषयीची माहिती वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचली. भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना कधी भेटलोही नाही. भाजपमध्ये निव्वळ शिफारशींवर पद किंवा उमेदवारी मिळत नाही, असा अनुभव आहे. भाजपची यंत्रणा सजग आहे, त्यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन सन्मान केला आहे.

प्रश्‍न : खासदार म्हणून कोणत्या प्रश्नांवर काम करणार?

उत्तर : विदर्भात सिंचनाचा प्रश्न आहे. शेती सुधारणा, शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे, प्रक्रिया उद्योगाला चालना असे अनेक विषय आहेत. अमरावती जिल्ह्यातील बेरोजगार तरूणांना काम उपलब्ध करून देण्यासाठीदेखील काम करावे लागणार आहे. या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी राज्यसभेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरू झालेला नांदगावपेठ येथील टेक्स्टाईल पार्क चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्याला‍ अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना मारायचे ठरवले का ; माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा सवाल

प्रश्‍न : आपल्यासमोर काय आव्हाने आहेत असे वाटते ?

उत्तर : केंद्र सरकारकडून अनेक चांगल्या योजना राबविल्या जात आहेत, पण दुर्दैवाने राज्य सरकारच्या असहकार्यामुळे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होताना दिसत नाही. विदर्भावर सातत्याने राज्य सरकारकडून अन्याय केला जात आहे. शेतकरी, ओबीसी, युवकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आता संघर्ष करावा लागणार आहेत. राज्यसभेत विदर्भाचे‍ प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याची शक्ती जनतेच्या सहकार्यातून मिळेल.

Story img Loader