नागपूर : भाजपच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, अनिल देशमुख यांना वैद्यकीय कारणांमुळे जामीन मिळाला नाही, त्यामुळे या कारणांवरून त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांनी प्रथम न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करावा, अशा शब्दांत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत भाजपला सुनावले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध खोटे आरोप असलेल्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाब टाकल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. त्याचे पुरावे ‘पेन ड्राईव्ह’मध्ये असल्याचा दावाही त्यांनी माध्यमांपुढे केला होता. अनिल देशमुख हे जामीनावर आहेत. ते दोषमुक्त झालेले नाही, असे, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. तोच धागा पकडून भाजपचे नेते देशमुखांवर हल्लाबोल करीत आहेत. भाजपचे विधान परिषद सदस्य परिणय फुके आणि अन्य काही नेत्यांनी अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करून त्यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी केली आहे. त्याला सलील देशमुख यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी खोट्या आरोपात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना जामीन देताना जे निरीक्षण नोंदविले आहे ते महत्त्वाचे आहे. न्यायालयाने दिलेला जामीन वैद्यकीय करणांसाठी नव्हे तर याचिकेतील गुणवत्तेवर दिला आहे. जे लोक जामीन रद्द करुन तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहेत, त्यांनी आधी न्यायालयाने जामीन देताना जे निरीक्षण नोंदविले आहे त्याचा अभ्यास करावा. त्यांच्या अशा पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असे सलील देशमुख म्हणाले.
हेही वाचा – सोन्याच्या दरात वारंवार बदल, हे दर बघून ग्राहक चिंचेत…
हेही वाचा – शंभर वर्ष जुन्या इमारतीचा व्यावसायिक वापर, उच्च न्यायालयात प्रकरण…
अनिल देशमुख यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. त्यांच्यावर ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप करण्यात आले आहेत. सर्व कागदपत्रे व जबाब ऐकल्यावर असे दिसते की, भविष्यात अनिल देशमुख या प्रकरणात दोषी ठरु शकणार नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने अनिल देशमुख यांना ‘क्लिन चिट’ दिली. असे असतानाही भाजपचे नेते अनिल देशमुख यांना परत तुरुंगात पाठविण्याच्या धमक्या देत आहेत. ज्या व्यक्तीने खोटे आरोप करण्यासाठी नकार देवून तुरुंगात जाणे पसंत केले. परंतु फडणवीस यांच्या कटकारस्थानात सहभागी झाले नाही, त्यांना तुम्ही तुरुंगात जाण्याच्या धमक्या दिल्याने काही होणार नाही. आमच्या कुटुंबियांवर ईडी आणि सीबीआयने १३० छापे घातले. माझ्या सहा वर्षांच्या मुलीची चौकशी करुन तिला त्रास देण्यात आला. संपूर्ण कुटुंबियांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. तरी देखील देशमुख हे झुकले नाहीत, असेही सलील देशमुख म्हणाले.