भाग्यवान आहात तुम्ही अनिस अहमदभाई! काय भव्य ‘घरवापसी’ झाली तुमची, तीही अवघ्या पाच दिवसांत. पण तुम्ही हा उपद्व्याप केलाच कशाला हे अनेकांना कळलेच नाही हो! आता काही म्हणतात की तुम्ही अर्ज भरण्याची वेळ मुद्दाम चुकवली. बंडखोरी करायचीच होती, पण काय करू वेळेत पोहोचलोच नाही असे तुमच्या सत्तेतील ‘मित्रांना’ दाखवायचे होते, तर बघा कशी फिरकी घेतली या मित्रांची हे पक्षाला. मानले बुवा तुम्हाला. ‘गेम’ खेळावा तर असा. ‘लाठी भी मेरी और भैस भी मेरी’. आता पुन्हा दिल्लीवाऱ्या करून व्यवसायवृद्धीसाठी तुम्ही मोकळे. त्यामुळेच तर तुम्ही गेली दहा वर्षे पक्षासाठी वेळ देत नव्हते. ‘वापसी’ करताना काय बोलले भाई तुम्ही.
तुम्हाला लवकर राग काय येतो, तुम्ही याच रागामुळे लहानपणी घर सोडून गेले व २४ तासात परतले. आता वय झाल्याने परतायला पाच दिवस लागले इतकाच काय तो फरक. बाकी तुमचा युक्तिवाद लाजवाब. गेल्या ४४ वर्षांपासून काँग्रेस तुमचे घर आहे म्हणे! मग दहा वर्षे या घराकडे पाठ का फिरवली? केवळ उमेदवारीच्या वेळीच घराची आठवण कशी आली? वंचितकडे जाण्याचे जाहीर करताना तुम्ही काँग्रेसशी ‘फारकत’ घेतली असे म्हणालात आणि आता सांगता पक्ष सोडलाच नव्हता. यातले खरे ते काय? आणि हो, हा सारा खटाटोप करताना त्या नानाभाऊंनी तुमच्या हाताखाली काम केले होते कधीकाळी हे आवर्जून सांगायची गरज काय? पटोलेंनी तुम्हाला उमेदवारी नाकारली की तुम्ही कुठे दिसतच नव्हते म्हणून पक्षाला तुमचा विसर पडला. यातली ‘मेख’ कधी उलगडून दाखवाल काय? काँग्रेस पक्ष फारच उदारमतवादी, म्हणूनच तुम्हाला परत घेतले, पण हे सगळे ‘कौम’ पाठीशी आहे म्हणून घडले या भ्रमात राहू नका भाई! समाज फार हुशार झालाय अलीकडे. त्याला बरोबर कळते कुणाची निष्ठा कुठे ते. तेव्हा तूर्तास प्रचार करा. निवडणूक संपली की आहेच दिल्लीतील ‘सत्ताधारी मित्र’!
– श्री.फ.टाके