पंजाबच्या मंत्रिमंडळातून आणखी एक मंत्री बाहेर पडले आहेत. फौजा सिंह सरारी असं त्यांचं नाव आहे. राजीनामा दिल्यानंतर फौजा सिंह सरारी यांनी आम आदमी पक्षावर कडाडून टीका केली आहे. आप हा कट्टर भ्रष्टाचारी पक्ष आहे अशी टीका सरारी यांनी केली आहे. यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची डोकेदुखी वाढली आहे.
पंजाब सरकार कायदा सुव्यस्थेच्या घटना, शेतकरी आंदोलनं, आयएस अधिकारी निलीमा आणि पीसीएस अधिकारी एन. एस. धालीवाल यांच्याविरोधात गुन्हे नोंदवणं या सगळ्या मुद्यांमुळे विरोधकांच्या रोषाचा सामना करतं आहे. राज्यातले पीसीएस अधिकारी सामूहिक रजेवर गेले आहेत. तसंच आयएएस अधिकारी निलीमा यांच्याविरोधातला गुन्हा रद्द केला नाही तर आम्हीही सामूहिक रजेवर जाऊ असं राज्यातल्या आएएस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. अशात मंत्र्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडणं आणि सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करणं हे भगवंत मान यांच्यासाठी तापदायक ठरतं आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आयएएस आणि पीसीएस अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली. त्यानंतर मुख्य सचिवांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १७ ए अंतर्गत मंजुरी न घेता गुन्हा कसा नोंदवला त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसंच दक्षता विभागाने योग्य प्रक्रिया पाळावी असंही त्यांनी सांगितलं आहे.
पंजाबमधल्या झिरा या ठिकाणी खासगी मद्य निर्मिती आणि दिल्ली कटरा महामार्गासाठी करण्यात येणारं भू संपादन या विरोधात पंजाबमधले शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू करत टोल प्लाझांवर धरणे आंदोलन केलं. अशी आंदोलनं सरकार व्यवस्थित हाताळू शकलं नाही तर त्याचा परिणाम भविष्यातल्या पीपीपी प्रकल्पावर म्हणजेच बांधा वापरा आणि हस्तांतरित करा अशा प्रकल्पांवर होईल असा इशारा नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाने दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही काही दिवसांपूर्वी राज्याला पत्र लिहून महामार्गाच्या कामाला गती द्या आणि वाटेत येणाऱ्या समस्या सोडवा अशी मागणी करणारं पत्र लिहिलं होतं.
मागच्या वर्षी मार्च महिन्याच्या १४ तारखेला पंजामध्ये कबड्डी मैदानावर कबड्डीपटू संदीप सिंग नांग यांची हत्या करण्यात आली.त्याचा तपास कुठपर्यंत आला हे अद्याप पंजाब सरकारने स्पष्ट केलेलं नाही. आप सरकार निवडून आल्यानंतर मे महिन्यात पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर रॉकेट प्रोपेल्ड आणि ग्रेनेड हल्ला करण्यात आला. सहा शूटर्सनी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या केली. या सगळ्या घटनांच्या बाबतीतही सरकार विशेष काही पावलं किंवा ठोस निर्णय घेत नसल्याचं दिसतं आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर लक्षात येतं की या सगळ्या समस्या म्हणाव्या तशा हाताळता न येणं आणि त्यापाठोपाठ एक एक मंत्र्याने राजीनामा देणं हे भगवंत मान यांना सत्ता चालवण्यातले अडथळे ठरत आहेत.